जळगाव : ओबीसी आरक्षण मिळाले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून त्याचे क्रेडिट घेतले; मात्र आता आरक्षण घालवले त्याचा ढोल का वाजवत नाहीत? असा टोला एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी लगावला. सरकारने आपली असेल नसेल ती शक्ती पणाला लावून तसेच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून ओबीसी आरक्षण मिळवून द्यावे, असेही खडसे म्हणाले.
कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो अत्यंत दुर्दैवी आहे, ओबीसींवर अन्याय करणारा आहे. सरकारला माझी विनंती होती, की ९२ नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणात व्हाव्यात. त्या जर आरक्षणाविना झाल्या तर ते योग्य होणार नाही.
मंत्रिमंडळ स्थापन होणे गरजेचे
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खडसे म्हणाले की, महाराष्ट्राची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे, आज अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. शेतक-यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची गरज आहे. विधान परिषद सेनेत फूट नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते म्हणाले, विधान परिषदेतील आमदार आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.