मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. दहा दिवस सुरत आणि गुवाहाटीत मुक्काम ठोकल्यानंतर या बंडखोरांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचा उमेदवारही निवडून आणला. विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वच बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात आले. कामांना सुरुवातही केली.
पण या सर्व काळात बंडखोरांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर एका शब्दानेही टीका केली नाही. उद्धव ठाकरे यांची स्तुती करताना संजय राऊतांवर मात्र सर्वच आमदार टीका करत होते. संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटल्याचा आरोपही काही आमदार करत होते. राऊत अचानक बंडखोरांच्या रडारवर आले. आमदार संजय राठोड, आमदार शंभुराज देसाई यांच्यानंतर आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले, संदीपान भुमरे, किशोर पाटील, शहाजी पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर या बंडखोरांनी राऊत रडारवर का आले, तेही सांगितले आहे.
या सगळ्या प्रकाराला राऊत जबाबदार : संदीपान भुमरे :
आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही राज्यसभेला आणि विधान परिषदेत पक्षांनी सांगितलेल्या उमेदवाराला मतदान केले. संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार झालो नाही तर आमच्यामुळे राऊत खासदार झाले. राऊत हे उरलेली सेना संपवतील. सेनेत राहिलेले लोक पण ते घालवून देतील. या सगळ्या प्रकाराला राऊत जबाबदार आहेत.
आमच्यावरची टीका क्लेशदायक : किशोर पाटील
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची वाताहत होत होती. त्यामुळेच पक्षाला वाचवण्यासाठी ४० आमदारांनी बंड केले. संजय राऊतांनी आमच्यावर केलेली टीका क्लेशदायक आहे. त्यांनी अशा पद्धतीने बोलायला नको होते.
बोलणी फिस्कटली : संजय राठोड
उद्धव ठाकरेंना समजावण्यात मला आणि गुलाबराव पाटील यांना यश आले होते. उद्धव ठाकरे हे तयार झाले होते. सुरतला आदित्य ठाकरेंना पाठवायचं म्हणून ठरलंही होतं. मात्र संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंविरोधात बोलणे सुरू केले म्हणून ते फिस्कटले. राऊत यांच्यामुळे बंडखोरी करण्याची वेळ आली. राऊत यांच्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. ‘मातोश्री’चे दार उघडल्यास पुन्हा जाईन, असेही संजय राठोड म्हणाले.
गद्दारी केली नाही : शंभूराज देसाई
आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणा-या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले आहे. त्यांनी जी काही अडीच वर्षे बडबड केली त्याला कोणीही महत्त्व देणार नाही. ज्या संजय राऊतांमुळे हे सगळं झालं त्याला महत्त्व देत नसल्याचे देसाई म्हणाले.
राऊतांचे मनगट अंगठ्याएवढे : शहाजी पाटील
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ फेम शहाजी पाटील यांनी या सर्वांवर कडी करत एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘राऊतांचं मनगट अंगठ्याएवढं आहे. पण हात वर करून याला कापून काढू, प्रेतं आणू असं बोलतंय. अरं तुझं तुला चालाय येईना. सकाळी बशीभर फवं खातंय, घरातून बाहेर पडतंय, झोपताना एक चपाती खाऊन झोपतंय. अरे ये आमच्याकडे बोकाड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो. मिळाली संधी उद्धव साहेबांमुळे म्हणून संजय राऊतांनी गैरफायदा घेऊ नये. तातडीने त्यांनी बोलणं बंद करावं. तरंच उरलंसुरलं ठाकरे घराण्याचं राहील. नाहीतर ठाकरे घराण्याला संपवायची सुपारी संजय राऊतानं घेतली आहे.
राऊतांची वक्तव्ये अशोभनीय : राजेंद्र पाटील यड्रावकर
संजय राऊत यांच्याकडून जी वक्तव्ये केली जात होती त्याचे परिणाम कसे होत होते या सगळ्या गोष्टींचा उलगडा यड्रावकर यांनी केला.बंडादरम्यान अपक्ष कोणीही शिवसेनेच्या संपर्कात नव्हते. राजकारणातील वक्तव्याची पातळी घसरली आहे. आम्ही गुवाहाटीला होतो त्यादरम्यान जी वक्तव्यं आली, ज्या घटना घडल्या त्या महाराष्ट्राला शोभतील आशा नाहीत, असे म्हणत यड्रावकर यांनी संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली.