मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री संदीपान भुमरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे, ते सांगतील तसेच घडेल, आता आमचं तेच नेतृत्व असेल.
कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानाने हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, बच्चू कडू, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्यासह ६ मंत्री आहेत.
संदीपान भुमरे म्हणाले, आम्ही आता ३५ ते ३६ जण सोबत आहोत. सगळे एकत्र आहोत. विशेषत: शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात एकत्र आहोत. ते सांगतील तसं करू. उद्धवसाहेबांचं आणि शिंदेसाहेबांचं काय बोलणं झालं ते आम्हाला माहिती नाही. पण शिंदेसाहेब जे सांगतील, जो आदेश देतील तसं करू.
आमचं म्हणणं आहे की मतदारसंघातील कामं व्हावीत, निधी मिळावा यासाठी सर्वांची नाराजी आहे. आम्ही पक्ष बदलणार नाही. शिंदेंसोबत राहणार. बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. एकनाथ शिंदेंसोबत राहणार. आम्ही शिवसेनेत राहणार, पण वेगळा गट राहणार, असे भुमरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी सर्व दिलं, तरीही नाराजी का?
मला वैयक्तिक काही नाही, मी काही मागितलं नाही. फक्त कामं झाली पाहिजेत हा हेतू होता. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कामं करताना अडचणी येतात. आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. तो माणूस असा आहे, सर्व कामं करतो. उद्धव ठाकरे म्हणाले तर सातव्या माळ्यावरून उडी मारू असं म्हणालो होतो, पण सत्ता आली तरी कामं होत नव्हती, मी वारंवार सांगत होतो उद्धव साहेबांना. मला कॅबिनेट मंत्रिपद आहे, त्यापेक्षा मोठं मला काय हवं.. पदासाठी मी गेलो नाही.