मुंबई : विश्वासदर्शक ठराव पास केला, अध्यक्ष नेमला मग मंत्रिमंडळ विस्तार का केला नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याठिकाणी पालकमंत्री नेमणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जनतेच्या वतीने मी विनंती करतो की, मंत्रिमंडळाचा त्यांनी विस्तार करावा, असेही अजित पवार म्हणाले.
अतिवृष्टीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, तो दूर करावा. अनेक ठिकाणी शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे देखील उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. ज्यांची घरं पडली आहेत त्यांना मदत करावी लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले. शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या युतीबद्दलही अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी त्यांनी सांगितले की, यावर उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करू, असे त्यांनी सांगितले. अनेकदा पाठीमागच्या सरकारने घेतलेले निर्णय फेरविचारासाठी घेतले जातात. तो त्यांचा अधिकार आहे. जे जनतेच्या हिताचे निर्णय असतात ते घेतले जातात. आम्ही तसे निर्णय घेतले आहेत. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक आहे. ती झाल्यानंतर मी अधिकृतरीत्या बोलेल असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रपती, मुख्यमंत्री पण थेट करा
बाजार समितीत शेतक-यांना संधी दिली त्याबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही. पण त्याचा बोजा हा बाजार समितीवर पडणार आहे. नगराध्यक्ष थेट करता, सरपंच थेट करता, मग मुख्यमंत्री पण थेट करा, पंचायत समितीचा सभापती पण थेट करा, राष्ट्रपती देखील थेट करा असेही अजित पवार म्हणाले. लोकशाहीत काही परंपरा घालून दिल्या आहेत.
त्याचे पालन करावे लागते असेही अजित पवार यावेळी म्हणाले. सरपंच आणि नगराध्यक्ष एका विचाराचे असतात. बॉडी दुस-या विचारांची असते. त्यामुळे बॉडीला विचारून निर्णय घेतले जात नाहीत. मग सत्ता एकहाती जाते आणि हे लोकशाहीला घातक असते, असेही पवार म्हणाले.