27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeवो सुबह कभी तो आयेगी!

वो सुबह कभी तो आयेगी!

एकमत ऑनलाईन

गर्भवती महिला पायी शेकडो किलोमीटर चालत आपल्या गावाकडे निघाल्या आहेत.. नातू आजोबाला खांद्यावर घेऊन पायी चालत आहे.. पायी चालून थकल्यामुळे रुळावरच झोपलेली माणसे मालगाडीखाली चिरडून मेली..यासारखी शेकडो दृश्ये गेल्या काही दिवसांपासून दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून दाखविली जात आहेत़ हे पाहून सुहृदयी माणूस हादरला नसेल तर आश्चर्य वाटायला नको़ एक महासत्ता होण्याची भाषा करणा-या आपल्या देशात हे सारे घडत आहे़ सा-या जगाने ही दृष्यं पाहिली़ महासत्ता होण्याची भाषा करणा-या देशाला हे शोभते का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला़ यात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारे यापैकी कोणाचे चुकले यावर या क्षणी तरी विचार केला जाऊ शकत नाही़ पण ही दृष्ये पाहून समाज हळहळला़ त्यातून समाज जिवंत आहे याची तरी किमान प्रचीती आली़

सध्याचे चित्र पाहिल्यानंतर गरीब म्हणून जन्माला येऊ नये असे प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही़ एखादा माणूस समोर आला की पहिले लक्ष त्याच्या चेह-याकडे जाते, नंतर त्याच्या पायाकडे पाहिले जाते़ मजूर हे या समाजाचे पाय आहेत़ कष्टाचे काम तेच करतात़ पण समाज श्रीमंतांचे कौतुक करतो़ या श्रीमंतांसाठी राबणा-या गरिबांना अर्थात समाजाच्या पायाला कोण किंमत देतो? म्हणूनच तळागाळातील या माणसाचा विचार सर्वांत शेवटी होतो़स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाने साम्यवाद, समाजवाद, मुक्त अर्थव्यवस्था आणि हिंदुत्ववाद यासारख्या अनेक प्रणाली पाहिल्या़ पण तळाचा माणूस आहे तिथेच राहिला़ मजूर म्हणून जन्माला आला आणि मजूर म्हणूनच मेला़ अशी कोट्यवधी माणसे या देशात आहेत ती जन्मली आणि मेली़ पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने याची जाणीव प्रथमच समाजाला झाली़

Read More  २६ कोरानामुक्त रुग्णांना सुटी; ३ नव्या रूग्णांची भर

त्यातूनच समाजालासुद्धा हृदय असते हे दिसून आले़ लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी हा मजूर कुठेच केंद्रबिंदू नव्हता़ सर्वत्र कोरोना विषाणू, लस, औषधी, आरोग्य कर्मचारी, चीनची नीच वृत्ती, सध्याची आर्थिक स्थिती आणि पुढे आर्थिक स्थिती काय होणार? भविष्य काय? यावर चर्चा होत होती़ पण स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या मजुराच्या सर्वांत मोठ्या स्थलांतराने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढवले़ मजुरांनी स्टेशनवर गर्दी केली तेव्हा ही मंडळी आपल्या घरात विषाणू घेऊन येतील अशी भीती व्यक्त करण्यात आली़ तरी पण समाज निश्चितपणे खडबडून जागा झाला हे या निमित्ताने दिसून आले़ गेल्या ७० वर्षांत परिस्थिती बदलली़ मध्यम वर्ग व श्रीमंत यांच्यातील दरी कमी झाली असली तरी मध्यम वर्गातून नवश्रीमंत झालेले अजूनही विचाराने मध्यमवर्गीय आहेत़ ते पैसा खर्च करताना खिशाचा विचार करतात़ श्रीमंतांबद्दल तर काही बोलायलाच नको़ मजुराला सामाजिक प्रतिष्ठा नसते़ तशी ती यापूर्वीही नव्हती आणि पुढेही मिळणार नाही़ डॉक्टरच्या दृष्टीने बायपास सर्जरी म्हणजे प्लम्बिंगचे काम आहे़ तो त्याच दृष्टीने आपल्या व्यवसायाकडे पाहतो़ पण मजुरांचे तसे नाही़

सध्या कामगार व मजूर यांच्यावरील अन्याय वेशीवर टांगणारा कोणताच नेता अथवा राजकीय पक्ष अस्तित्वात राहिलेला नाही़ कामगार संघटना पद्धतशीरपणे मोडित काढण्यात आल्या़ आहे त्या संघटना कारखानदारांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत़ राजकीय पक्षांचीही तीच स्थिती़ ते नेहमी कारखानदारांचीच बाजू घेतात़ त्यामुळे मजुरांची बाजू मांडणार तरी कोण? असा सवाल आता उपस्थित झाला आहे़ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आणि पर्यायाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे़ अर्थचक्र ठप्प झाले आहे़ मजूर-कामगार देशोधडीला लागले आहेत़ ही परिस्थिती आपल्याला एक नवी संधी घेऊन आली आहे़ त्यातून देश स्वावलंबी व्हायला मदत मिळणार आहे, अशी लालूच देशाच्या पंतप्रधानांनी दाखवली़ बहुराष्ट्रीय कंपन्या चीनवर नाराज आहेत असे सांगून त्या आता भारतात येणार असे चित्र निर्माण केले जात आहे़ या उद्योगपतींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी चांगले आर्थिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी आता कामगार कायदे बदलले जात आहेत़ भाजप शासित तीन राज्यांनी याची सुरुवात केलीच आहे़आहे त्या कामगार कायद्यांना स्थगिती देणे म्हणजे या गरीब कामगार कष्टकरी वर्गाला गुलामीचे जिणे नशिबी आणण्यासारखे आहे़

Read More  स्थलांतरित मजुरांसाठी मोदी सरकारची मोठी तरतूद!

कामगार कायदे शिथिल करून कारखानदारांना योग्य वातावरण निर्माण करून देणे म्हणजे नेहरूंनी जोपासलेला आर्थिक समाजवाद पूर्णपणे मोडित काढण्यासारखे आहे़ आपल्या घटनाकर्त्यांनी घटना तयार करताना दूरवरचा विचार करून कायदे निर्माण केले होते़ तेच आज मोडित काढले जात आहेत़ हे कायदे रद्द केल्यानंतर मजूर आणि कामगारांना त्यांचे अधिकार मिळणार काय? कारखानदार त्यांना त्यांचे अधिकार देणार काय? कारखानदारांवर किती विश्वास ठेवायचा हे तपासून पहावे लागेल़ लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेकडो कारखानदारांनी मजुरांना वा-यावर सोडून दिले़ परिणामत: आज स्थलांतरासारखी भीषण दृष्ये आपल्याला पहायला मिळत आहेत़ या कष्टकरी वर्गाचा कारखानदारांनी फक्त वापर करून घेतला़ त्यांचा उपयोग संपला की, त्यांना अक्षरश: सोडून दिले हे या निमित्ताने दिसून आले आहे़ अनेक वर्षे काम करूनही हे कामगार काही महिने तग धरून राहू शकले नाहीत. हे असे का झाले? याचा अर्थ त्यांचे उत्पन्न कमी होते आणि क्रयशक्तीसुद्धा अल्प होती हे स्पष्ट होते़

कारखाना-कंपनी बंद होताच हे मजूर आणि कामगार परत आपल्या राज्यात निघून जाण्यास का उद्युक्त झाले? ज्या शहरात ते रहात होते, ज्या शहराने त्यांना रोजीरोटी दिली त्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम उत्पन्न झाले नाही़ ते या मातीशी कधीही एकरूप झाले नाहीत़ ही चूक कोणाची? या प्रश्नाचे उत्तर कोणीही देणार नाही़ मजुरांची ही स्थिती तर घराघरांमधून काम करणा-या मोलकरणी आणि अन्य कामगारांची परिस्थिती यापेक्षा वाईट आहे़ साधारणपणे नोकरी करणाºया महिलांच्या घरी स्वयंपाक, भांडी-धुणी करण्यासाठी आणि घर स्वच्छ करण्यासाठी महिला कामगार ठेवल्या जातात़ ९० टक्के कामे या महिलाच करत असल्यामुळे नोकरदार महिला वर्ग त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो़ काम करणाºया या महिला आणि नवरा यापैकी सोडून देण्याची वेळ आल्यास कोणाला सोडणार? असा प्रश्न केल्यास मी नवºयाला सोडून देणार पण कामवाल्या बाईला सोडणार नाही असे विनोदी उत्तर ब-याच वेळा ऐकायला मिळते़ यावरून भारतातील एक समृद्ध वर्ग अशा घरेलू कामगारांवर किती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे हे ध्यानात येते़

Read More  सामान्य लोकांना लष्करात नोकरीची सुवर्णसंधी

एका अंदाजानुसार भारतात असे ५० लाख घरेलू कामगार आहेत़ लॉकडाऊनमुळे त्यांचे उत्पन्नही बुडाले आहे़ यापुढे त्यांना त्यांचे काम पुन्हा मिळणार काय असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे़ लॉकडाऊन संपल्यानंतर पुढे काय? असा सवाल सर्वांपुढेच उभा आहे़ परदेशात गेलेले भारतीय परत येत आहेत़ त्यांना येथे नोकºया मिळणार काय? किंवा ते आले म्हणून स्थानिक कामगारांना नोकरीतून काढून या परदेशातून आलेल्या मंडळींना नोकरीवर ठेवणार काय असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत़ येत्या काही वर्षांत भारतातील ५० टक्के लोकांचे उत्पन्न घटेल असा अंदाज आहे़ परिस्थिती भीषण आहे़ ती आणखी गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत़ यातून अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होते की काय? अशी चिंता भेडसावत आहे़ तरीपण समाज आणि माणूस हा आशेवर जगत असतो़ सूर्य उगवतो तसा मावळत असतो, अंधारानंतर सकाळ येत असते. या वाईट परिस्थितीतूनही काहीतरी निष्पन्न होईल असे म्हणताना साहीर लुधियानवी यांची ‘वो सुबह कभी तो आयेगी’ ही कवी कल्पना मनाला दिलासा देते इतकेच!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या