नवी दिल्ली: देशभरात पुन्हा एकदा देशात १ जून रोजी एलपीजीच्या किमती वाढू शकतात. गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दर निश्चित करतात. यावेळी घरगुती एलपीजीची किंमत ११०० रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही १ तारखेपूर्वी गॅस बुक करून काही बचत करू शकता.
सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १००३ रुपये, मुंबईत १००२.५ रुपये, कोलकात्यात १०२९ रुपये आणि चेन्नईमध्ये १०५८ रुपये आहे.
मे महिन्यात दोनदा भाव वाढ
गॅस कंपन्यांनी मे महिन्यात घरगुती एलपीजीच्या दरात दोनदा वाढ केली होती. पहिला दर ७ मे रोजी वाढवण्यात आला होता. या दिवशी १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली. म्हणजेच १ महिन्यात एलपीजीवर एकूण ५३.५ रुपयांची वाढ करण्यात आली. जागतिक बाजारपेठेतील गॅसच्या किमती पाहता १ जून रोजी पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
१ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. दिल्लीत त्याची किंमत १०२ रुपयांनी वाढली आहे. यानंतर राजधानीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत २३५५.५ रुपये झाली. त्याच वेळी, ५ किलोच्या लहान एलपीजी सिलिंडरची किंमत ६५५ रुपये करण्यात आली आहे.