मुंबई : सर्वांच्या साथीने राज्याचा विकास करणार, राज्याचा विकास आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम अशी पहिली प्रतिक्रिया नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्याचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज शपथ घेतली.
शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या विचारांच्या आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणीचा विजय आहे. राज्याचा विकास आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे. सर्वांच्या साथीने विकासाचा गाडा नेण्यात येईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सोबत कायम आहे, त्यांच्या साथीने महाराष्ट्राचा विकास करू.
आज राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.