19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयसीमाप्रश्नी लवकरच तोडगा?

सीमाप्रश्नी लवकरच तोडगा?

एकमत ऑनलाईन

पंतप्रधानांची मध्यस्थी, ४ नोव्हेंबरला कोल्हापुरात व्यापक बैठक
कोल्हापूर : गेली अनेक दशके प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार सीमाभागातील प्रश्नांबाबत ४ नोव्हेंबरला कोल्हापुरात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणा-या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल, सीमा भागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ही बैठक होणार आहे.

या बैठकीच्या माध्यमातून अनेक दशकांपासून सुरू असलेल्या बेळगाव सीमा प्रश्नावर तोडगा निघणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रश्नात मध्यस्थी केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकची अशाप्रकारे व्यापक आणि संयुक्त बैठक कधीच झाली नव्हती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार अशी बैठक होणार आहे. पंतप्रधानांनी मध्यस्थी केल्याने हा प्रश्न सुटेल, अशी आशा दोन्ही बाजूंकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आजच बेळगावमध्ये काळा दिन पाळून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. १९५६ पासून सीमावासीय महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत आहेत. अनेकवेळा या मुद्यावरून हिंसक आंदोलनेही झाली. दोन्ही राज्यपालांच्या उपस्थितीत होणा-या या बैठकीत सीमाप्रश्न सुटणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दोन्ही राज्यांतील विविध
प्रश्नांवर होणार चर्चा
सीमा भागातील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही राज्यांकडून केला जाणार आहे. पुरामुळे अलमट्टी धरणाचा फटका कोल्हापूर आणि सांगलीला बसतो, या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने पुढे आणला आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. हा विषयही या बैठकीत असणार आहे. सीमा भागात हत्तींचा वावर वाढला आहे, त्याचा बंदोबस्त करण्याचा विषयही चर्चिला जाऊ शकतो. याशिवाय गर्भंिलग चाचण्या, शालेय दाखले याबाबतही चर्चा होणार आहे.

लातूरसह सीमेलगतच्या
जिल्हाधिका-यांची उपस्थिती
लातूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत, तर कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीही या बैठकीला हजर राहणार आहेत, असे सांगण्यात आले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या