मुंबई : वाढती व्यापारी तूट आणि यूएस फेडने विक्रमी चलनवाढ रोखण्यासाठी केलेली दरवाढ याचा फटका आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाला बसणार आहे. कारण येत्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८२ पर्यंत घसरण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. येत्या २६, २७ जुलैच्या बैठकीत यूएस फेड व्याजदरात अर्धा ते पाऊण टक्का वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना उद्योगासाठी भांडवल उभे करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कारण कच्च्या तेलाचे वाढते दर आणि डॉलरची मागणी यामुळे रुपयाचे आणखी अवमूल्यांकन होईल. याचमुळे गेल्या आठवड्यात रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.०५ इतकी ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली होती.
कच्च्या तेलाच्या किमतीत आलेली स्थिरता आणि रशिया युक्रेन युद्धजन्य परिस्थितीत सुधारणा झाल्यास रुपयाने सर्वकालिक निचांकी पातळी गाठल्यानंतर तो येत्या मार्च महिन्यापर्यंत ७८ च्या दरापर्यंत स्थिरावेल. यंदाच्या संपूर्ण आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७९ च्या आसपास स्थिरावेल, असा अंदाज होता. पण सध्याच्या घसरणीच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे रुपया येत्या काळात ८१ रुपये प्रतिडॉलर इतका असेल, असे इंडियन रेटिंग आणि रिसर्चचे प्रमुख अर्थतज्ज्ञ सुनील कुमार सिन्हा यांनी सांगितले.
परकीय गुंतवणूक ठरवणार दिशा
जागतिक आर्थिक स्थिती आणि भारतात होणारा परकीय गुंतवणुकीचा ओघ हा येत्या काळात भारतीय रुपयाचे अवमूल्यांकन सुरू राहील किंवा नाही हे ठरवेल. तसेच अमेरिकेतील मंदीमुळे चलनबाजारात डॉलरचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, असे आयआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी सांगितले.