22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयक्षमता, ज्ञान, विश्वासाला अनुसरून काम करणार

क्षमता, ज्ञान, विश्वासाला अनुसरून काम करणार

एकमत ऑनलाईन

काय केले यापेक्षा कशा पद्धतीने केले हे महत्त्वाचे : न्यायाधीश
नागपूर : तुम्ही काय केले हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही ते कशा पद्धतीने केले हे महत्त्वाचे आहे, असे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी म्हटले आहे. मी जे काही करणार ते माझ्या क्षमता, ज्ञान आणि विश्वासाला अनुसरून असेल, असे सांगत येत्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात आपले काम कसे असेल, याचे त्यांनी संकेत दिले.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या बार असोसिएशनने आज सरन्यायाधीश उदय लळीत यांचा नागपुरात सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृहात सरन्यायाधीश यांचा सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ््यात सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही न्यायाधीशही उपस्थित होते. सरन्यायाधीश उदय लळीत हे सरन्यायाधीशपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते.

माझ्या नागपूरबद्दलच्या, नागपूरच्या वकील आणि लोकांबद्दलच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. मला आनंद आहे की, मी वकिलांच्या कुटुंबातून आहे. माझ्या आजोबांनी १९२० मध्ये सोलापूरला वकिली सुरू केली. आज १०२ वर्ष झाले, ही मालिका अखंडपणे सुरू आहे. मी इथे कुठलेही वचन देण्यासाठी आलेलो नाही. मात्र मी जे काही करणार ते माझ्या क्षमता, ज्ञान आणि विश्वासाला अनुसरून असेल, असे ते म्हणाले.

यावेळी रुडयार्ड किपलिंगच्या कवितेच्या ओळी कोट करताना ते भावूक झाले. अश्रू ओघळले, काही वेळ थांबल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांचे भाषण पुन्हा सुरू केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, सरन्यायाधीश उदय लळीत फक्त सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख नाही, तर ते संपूर्ण देशाच्या न्याय व्यवस्थेचे कौटुंबिक प्रमुख आहेत. ते न्याय व्यवस्थेचे प्रमुख म्हणून पूर्णपणे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत. सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी लगेच सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक घेतली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना लवकर निकाली काढण्याच्या सूचना देत सर्वोच्च न्यायालयाचे सकाळचे सत्र प्राधान्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांसाठी ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात १० वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असलेले १०६ प्रकरणे निकाली निघाले.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता हे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, सरन्यायाधीश उदय लळीत हे आईस्क्रीमचे चाहते आहेत. मला असे कळले आहे की नागपुरात असताना ते सदर परिसरातील दीनशॉ आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन भरपूर आईस्क्रीम खायचे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या