24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमॉलमध्ये वाईन, ठाकरे सरकारचे स्वप्न शिंदे सरकार पूर्ण करणार?

मॉलमध्ये वाईन, ठाकरे सरकारचे स्वप्न शिंदे सरकार पूर्ण करणार?

एकमत ऑनलाईन

लोकांकडून आलेल्या हरकती-सूचना विचारात घेऊन निर्णय, मंत्र्यांचे संकेत, भाजपचा विरोध

मुंबई : सुपर मार्केट व वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीला अनुमती देण्याच्या मागच्या निर्णयावर नवे सरकार शिक्कामोर्तब करणार असे संकेत आहेत. लोकांचे अभिप्राय, सूचना राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा आपण स्वत: प्रथम अभ्यास करू व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळासमोर जाऊ, अशी माहिती उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिली. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी या प्रस्तावाला विरोध केला असून, याला विरोध केला जाईल, असे म्हटले. त्यावरून भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुपर मार्केट व वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीला अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावर जोरदार टीका झाल्याने तो पुढे न रेटता धोरणाचा मसुदा जाहीर करून लोकांचे अभिप्राय मागवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकांचे अभिप्राय, सूचना राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा आपण स्वत: प्रथम अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू व नंतर मंत्रीमंडळासमोर जाऊ, अशी माहिती उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला, तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने जोरदार विरोध केला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले असल्याची टीकाही केली होती. तेव्हा राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांना फायदा व्हावा, यासाठीच आपण हा निर्णय घेतला असल्याचे समर्थन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केले होते.

मॉलमधून वाईन विक्रीसंदर्भात लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत या राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत. आता त्याची वर्गवारी करण्यात येत आहे. शहरी, ग्रामीण तसेच बाजूने आणि विरोधात अशी वर्गवारी करण्यात येईल. त्यानंतर मी त्याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. नंतर मंत्रीमंडळासमोर जाऊ. राज्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होते. पण ही द्राक्षे शेतक-यांकडून थेट वायनरीकडे जात नाहीत. शेतक-यांकडून जर द्राक्ष १० रूपयाला खरेदी केली तर मध्यस्थ ती वायनरीला शंभर रूपयांना विकतो.

शेतक-यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे शेतक-यांनी एकत्र येऊन स्वत:चे वाईन यार्ड बनवावे व उत्पादन करावे, अशी आपली भूमिका आहे. याचा अर्थ सरकारच दारू उत्पादन व विक्री वाढवायला लागली, असा होत नाही. पण फायदा हा कुठल्याही परिस्थितीत शेतक-याचाच झाला पाहिजे, असेही देसाई म्हणाले.

शेतक-यांना होऊ शकतो फायदा
थेट शेतक-यांंनीच जर वाईन उत्पादन केले तर ते शेतक-यांच्या हिताचे ठरेल, असेही ते म्हणाले. याचा अर्थ राज्यात दारू विक्री वाढविणे असा होत नाही. पण शेतक-यांना फायदा झाला पाहिजे, अशीच आपली भूमिका असल्याचेही देसाई म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या