25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeदहशतवादी कसाबची ओळख पटवणा-या साक्षीदाराचे निधन

दहशतवादी कसाबची ओळख पटवणा-या साक्षीदाराचे निधन

एकमत ऑनलाईन

ठाणे  : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात जिवंत सापडलेल्या एकमेव दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवणा-या आणि कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे आजारपणात निधन झाले. कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील वास्तुसिध्दी इमारतीमध्ये ते राहत होते.

मूळचे कोकणातील हरिहरेश्वर येथील असणारे श्रीवर्धनकर अन्न नागरीपुरवठा खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशी देण्यात ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती. त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलने घातलेल्या दोन गोळ्यादेखील लागल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते.

काही दिवसांपूर्वी हरिश्चंद्र अत्यंत कठीण परिस्थितीत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी खर्च परवडत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळेच ते निराधार अवस्थेत फूटपाथवर आढळले होते. बरेच दिवस त्यांनी काही खाल्ले नव्हते. मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील डिसूझा नामक दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली. या घटनेनंतर तातडीने गौरीपाडा प्रभागाचे भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांनी प्रभागातील देशप्रेमी, निडर, दक्ष नागरिक हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना मदतीचा हात देत खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले होते.

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमध्ये या खासगी हॉस्पिटलमध्ये भेटीला आले होते. या समयी भाजपतर्फे श्रीवर्धनकर कुटुंबीयांना १० लाखांचा मदतनिधी देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. अखेर या आजारपणामुळे मंगळवारी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धनकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.

त्यांच्या अंतयात्रेत गर्दी न होऊ देता सोशल डिस्टन्स पाळत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी महापौर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दया गायकवाड आदी मोजकेच नागरिक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या