उपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू

    366

    लखनौ: वृत्तसंस्था
    लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना अनेक संकटांचा समाना करावा लागत असल्याचे धक्कादायक व्हीडीओ समोर येत आहे. असाच एक हृदयद्रावक व्हीडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हीडीओ बिहारमधील एका रेल्वे स्थानकावरील आहे. या व्हीडीओमध्ये एक लहान मुलगा प्लॅटफॉर्मवर पडलेल्या आपल्या आईच्या मृतदेहावरील चादर खेचून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच दिसत आहे. सध्या हा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या घटनेसंदर्भात हळहळ व्यक्त केली आहे.

    व्हायरल झालेल्या या व्हीडीओमध्ये एका महिलेचा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पडल्याचे दिसून येत आहे. या मृतदेहावरील चादर खेचून या महिलेचा लहान मुलगा तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुलगा तिच्या अंगावर चादर खेचून काढतो़ मात्र त्या महिलेकडून काहीच प्रतिसाद त्याला मिळत नाही. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांनी हा व्हीडीओ चित्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू उपासमारीमुळे झाला आहे. भूकेबरोबरच प्रचंड उष्णता आणि शरिरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रेल्वे स्थानकातच या महिलेने प्राण सोडल्याचे कुटुंबिय सांगतात.

    Read More  रास्ता रोको : चंद्रपुरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन

    हा सर्व धक्कादायक प्रकार बिहारमधील मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मरण पावलेली २३ वर्षीय महिला ही श्रमिक विशेष ट्रेनने सोमवारी (२५ मे) बिहारमध्ये दाखल झाली होती. याच स्थानकावर अन्य एका घटनेत एका लहान मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरेसे अन्न न मिळाल्याने आणि उष्णतेच्या त्रासामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत मुलाचे कुटुंबिय रविवारी दिल्लीवरून रवाना झालेल्या ट्रेनने बिहारमध्ये दाखल झालं होतं.

    व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी २३ वर्षीय महिलेने शनिवारी (२३ मे रोजी) गुजरातमधील अहमदाबाद रेल्वे स्थानकातून श्रमिक विशेष ट्रेन पकडली होती. मात्र प्रवासादरम्यान पुरेश्या प्रमाणात पाणी आणि अन्न न मिळाल्याने या महिलेला बरे वाटत नव्हते. अखेर रेल्वे मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर खाली उतरल्यावर या महिलेला चक्क आली आणि ती खाली पडली. काही जणांनी या महिलेला प्लॅटफॉर्मवरील एका ब्रिजखाली ठेवले तिथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे लहान मुल तिच्या अंगावरील चादर खेचून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्याच्या मोठ्या भावाने त्याला आईपासून दूर केले.

    ही महिला ट्रेनमध्ये बसली तेव्हाच तिला बरे वाटत नव्हते. या महिलेचा मृत्यू झाल्याने तिचे कुटुंबिय मुज्जफरापूर रेल्वे स्थानकामध्ये उतरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. ही महिला आधीपासूनच आजारी होती, असे तिच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. २३ मे रोजी अहमदाबादवरुन कटिहारला जाण्यासाठी त्यांनी ट्रेन पकडली होती. २५ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबिय मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात उतरले. चुकीची माहित पसरवू नका असे आवाहन करतो, असे ट्विट रेल्वेच्या प्रवक्त्यांनी केले आहे़ २५ मार्चपासून देशभरामध्ये सुरु असणा-या लॉकडाउनमुळे देशभरातील मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकजण हातचे काम गेल्याने शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करुन आपल्या मूळ राज्यात पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान झालेल्या काही अपघातांमध्ये स्थलांतरित मजुरांचे प्राण गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजूर आणि कामगारांच्या सुरू झालेल्या आणि अजूनही होत असलेल्या हालअपेष्टांची स्वाधिकारात (सुओ मोटो) दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांकडे उपायांबाबत विचारणा केली आहे.

    बाप रेल्वे स्थानकात दूध शोधत असताना चिमुकल्याने सोडला जीव
    दिल्लीहून बिहारला आलेल्या श्रमिक मजुराच्या साडेचार वर्षाच्या मुलाचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. दिल्लीहून श्रमिक विशेष ट्रेनने बिहारमधील मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मुलाला भूक लागली असल्याने वडील रेल्वे स्थानकामध्ये दूध मिळतय का शोधत असतानाच या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.

    दिल्लीमधील झोपडपट्टीमध्ये राहणारा मसूद आलम हा मूळचा पश्चिम चंपारण जिल्ह्यातला. मागील अनेक वर्षांपासून तो दिल्लीमध्ये रंगकाम करण्याचे काम करत होता. पत्नी झेबा आणि मुलगा इश्क असे मसूदचे त्रिकोणी कुटुंब होते. मात्र लॉकडाउन सुरु झाल्यानंतर सर्व काम ठप्प झाल्याने मसूदच्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं. एका मागून एक दिवस लॉकडाउन वाढत असल्याने साठवून ठेवलेले पैसेही संपल्याने मसूदने कुटुंबासहीत आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. झोपडपट्टीमधील भाड्याच्या घरात राहणाºया मसूदने डिपॉझीटही न घेता दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला. श्रमिक विशेष ट्रेनने हे तिघेही रविवारी बिहारला येण्यासाठी निघाले. ईद आपल्या कुटुंबाबरोबर साजरी करण्यासाठी मसूद आणि झेबा उत्सुक होते. मात्र ट्रेनमध्येच त्यांच्या मुलाला त्रास सुरु झाला. प्रचंड उष्णतेमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. आम्ही मुज्जफरपूर स्थानकात पोहचेपर्यंत त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. त्यामुळे मी स्थानकामधील अधिकाºयांना शोधून दूध मिळण्यासंदर्भात मागणी केली. त्यांनी माझ्या विनंतीला प्रतिसाद देईपर्यंत मुलाने प्राण सोडले होते, असे मसूदने सांगितले.

    ईदनिमित्त आम्ही घरी जाऊन एकत्र आनंद साजरा करण्याचा विचार करत होतो. पण आमच्या नशिबात वेळच काहीतरी वाढून ठेवले होते, याचा आम्हाला अंदाज नव्हता, अशा शब्दांमध्ये मसूदने आपले दु:ख व्यक्त केले. तर झेबाला मुलाच्या मृत्यूमुळे मोठा झटका बसला असून ती काहीही बोलण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे़ रेल्वेचे पोलिस उपअधीक्षक रमाकांत उपाध्याय यांनी ट्रेनमध्येच मुलाची तब्बेत बिघडली आणि ट्रेन मुजफ्फरपूर स्थानकात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असा दावा केला आहे.