27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रसेमिफायनल जिंकली, सोमवारी फायनल

सेमिफायनल जिंकली, सोमवारी फायनल

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर ५७ मतांनी विजयी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३९ आमदारांनी शिवसेनेचा व्हीप धुडकावून नार्वेकर यांना मतदान केले. यामुळे राहुल नार्वेकर यांना १६४, तर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. या निवडणुकीत सपा व एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मतविभाजनाचा कौल जाहीर करून नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे १६ वे अध्यक्ष म्हणून नार्वेकर यांनी सूत्रे स्वीकारली. दरम्यान, आता उद्या सोमवारी शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या सरकारसाठी ही फायनल लढत असेल. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविल्याने मार्ग सुकर असेल, असे सांगितले जात आहे.

शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार सत्तारूढ झाले. नवीन सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली.

अध्यक्षपदासाठी शिंदे गट व भाजपकडून राहुल नार्वेकर व महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजन साळवी रिंगणात होते. आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा युतीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करावी, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चेतन तुपे यांनी अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला कॉंग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर झिरवाळ यांनी
हा प्रस्ताव मतास टाकला.

प्रस्तावाच्या बाजूने अनुकूल आणि प्रतिकूल मते जाणून घेण्यापूर्वी ५ मिनिटे सभागृहाची घंटी वाजविण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून मतविभागणी घेण्यात आली. एकेका सदस्याने उभे राहून आपले मत नोंदवले. नार्वेकर यांना १६४ तर साळवी यांना १०७ मते मिळाली. तीन सदस्य तटस्थ राहिले. तर १२ आमदार गैरहजर होते. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या आमदारांसह बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती, शेकापसह ६ अपक्ष आमदारांनीही राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले, तर माकपच्या विनोद निकोले, क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार यांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले.

मतमोजणी झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले. या बरोबरच शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केल्याचे पत्र त्यांच्या प्रतोदांकडून आपल्याला मिळाले असून त्याची नोंद आपण करत असल्याचे उपाध्यक्षांनी सांगितले.

नार्वेकरांनी पदभार स्वीकारला
उपाध्यक्षांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अजय चौधरी यांनी नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या आसनाजवळ नेले व त्यांनी जवळपास गेल्या दीड वर्षांपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

सर्वांत तरुण अध्यक्ष
राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे आहेत. ते विधानसभेचे आजवरचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत. नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत आणि आता ते भाजपाचे आमदार आहेत. ते अत्यंत कमी वयात विधानसभा अध्यक्ष झाले. यासाठी फडणवीस यांनी खेळी केली.

गटनेतेपदाचा वाद पेटणार! आता व्हीपवरून परस्परविरोधी दावे
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिवसेना पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी बंडखोर ३९ आमदारांनी पक्षादेश झुगारल्याचे पत्र दिले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी हे पत्र रेकॉर्डवर आणण्याची सूचना केली. त्यानंतर झिरवाळ यांनी हे पत्र वाचून दाखवत शिवसेनेचा व्हीप झुगारून ३९ बंडखोर आमदारांनी मतदान केल्याचे सांगितले आणि तशी नोंद घेण्याचे आदेश दिले.

त्यानंतर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच शिंदे गटाकडून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्र देण्यात आले. हे पत्र शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी दिले. नार्वेकर यांनी या पत्राचे वाचन करताना गोगावले यांचा शिवसेना पक्षप्रतोद असा उल्लेख करीत सभागृहात पत्र वाचून दाखवत नोंद घेतल्याचे सांगितले. या पत्रात १६ आमदारांनी विरोधात मतदान केल्याचे म्हटले आहे.

सुनील प्रभू यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडताना व्हीप मोडून मतदान केल्याने तुम्ही या खुर्चीवर किती काळ असाल, याबद्दल मला शंका असल्याचे म्हटले. त्यानंतर बंडखोर गटाचे दीपक केसरकर यांनीही १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावू शकतो, असे सांगत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे पुढील काही दिवसांत शिवसेना विधिमंडळ पक्षनेत्यावरून वाद चांगलाच चिघळण्याची चिन्हे आहेत. आमदार अपात्रतेच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयमध्ये प्रकरण प्रलंबित आहे. ११ जुलैला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

जावई-सासरे सर्वोच्च पदावर
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्याचा दुर्मिळ योग घडून आला. राहुल नार्वेकर विजयी झाल्याने सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधी मंडळावर पाहायला मिळणार आहे. भाजपचे राहुल नार्वेकर कुलाब्याचे आमदार आहेत. ते आता विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई असल्याने सासरे-जावई सर्वोच्च पदावर येण्याचा हा दुर्मिळ योग आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या