जुन्या पेन्शनच्या मागणीवर सरकारी कर्मचारी ठाम
मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी संघाने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी १४ मार्चपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढणार आहे. दरम्यान, राज्य कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रतिनिधींची सोमवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, अगोदरच दिंडोरी येथून आज माकपच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे लाल वादळ मुंबईकडे निघाले आहे. त्यातच आता १४ मार्चपासून राज्य कर्मचा-यांनी बेमुदत आंदोलन सुरू केल्यास सरकारची कोंडी होऊ शकते.
जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. मात्र, राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. उलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना राज्याला परवडणारी नाही. याचा बोजा पडल्यास २०३० पासून राज्याचा आर्थिक डोलारा कोलमडेल, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे राज्य कर्मचा-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, राज्य कर्मचारी संघटना या बेमुदत आंदोलनावर ठाम असून, अगोदरच ठिकठिकाणी आंदोलन करून वातावरण निर्मिती केली जात आहे.
यासोबतच विविध विभागाचे कर्मचारीही या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देत असून, आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनीही काल या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आरोग्य विभागाची सेवा कोलमडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज्य सरकारचे कार्यालये ओस पडल्यास बरेच कामकाज ठप्प होऊ शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, आज सांगलीत जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी आज सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी विराट मोर्चा काढला. या मोर्चात आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडताना जुनी पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे, अशी मागणी केली. या निमित्ताने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे.
मुख्य सचिवांनी बोलावली बैठक
जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीवर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक ठाम असल्याने याची दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबईत राज्य कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रतिनिधीची सोमवारी रात्री बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मात्र, हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.