मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून २०२२ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या १७ जून रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड एज्युकेशनमार्फत उद्या दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती.
मंडळाकडून २० जूनपर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे १७ जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.
कुठे पाहाल निकाल?
विद्यार्थी आणि पालकांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या लिंकवर निकाल पाहता येईल. तसेच निकालाची प्रतही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.