नवी दिल्ली : देशात ऑनलाईन पेमेंट आणि व्यवहारांत दिवसागणिक प्रगती होत असून आता लवकरच डेबिट कार्डाशिवाय एटीएममधून नागरिकांना पैसे काढण्याची सुविधा प्राप्त होणार असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय)ने नुकतीच जारी केली आहे.
यूपीआय पेमेंटच्या क्रांतीने बँकिंग क्षेत्रासह व्यवहारात ही गतिमानता आणली आहे. अवघ्या काही सेकंदात तुम्हाला रक्कम वळती करता येते, बिल अदा करता येते, रक्कम अदा करता येते, विमा खरेदी करता येतो, गॅस बुकिंग करता येते आणिक काय, काय करता येते. तेही एकाच ऍपवर. तर मंडळी आता हेच युपीआय पेमेंट ऍप तुम्हाला एटीएममध्ये ही उपयोगी ठरणार आहे. एटीएममध्ये डेबिट कार्ड वापरायची गरज आता भासणार नाही. देशातील काही ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून एटीएममधून रक्कम काढता येते. आता ही सोय देशातील सर्वच एटीएममध्ये लवकरच सुरु करण्यात येणार आहे. आरबीआयने बँकेने याविषयीचे दिशानिर्देश दिले आहेत.
डेबिट कार्ड हद्दपार होणार?
यूपीआय पेमेंट ऍप पेटीएम, गुगल पे, ऍमेझॉन पे, फोन पे यासह तुम्ही वापरत असलेल्या यूपीआय पेमेंट ऍपच्या माध्यमातून व्यवहाराची सुविधा देण्याचे निर्देश केंद्रीय बँकेने दिले आहेत. आता या निर्देशानंतर देशातील सर्व बँकांना त्यांच्या एटीएम मशीनमध्ये आवश्यक तो बदल करून युपीआय पेमेंटसाठीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागेल. या नव्या पद्धतीत तुमचे डेबिट कार्ड व्यवहारातून हद्दपार होईल.
यूपीआयची मोठी भूमिका
ग्राहक यूपीआय पिनच्या वापरातून त्यांची अधिकृतता सिद्ध करतील आणि एटीएम मशीन मधून रक्कम बाहेर येईल. विशेष म्हणजे एटीएममधून यूपीआय ऍपद्वारे रक्कम काढण्याची ही प्रक्रिया संपूर्णत: नि:शुल्क असेल. कोविड काळात सुरक्षित आणि त्वरीत सेवेमुळे डिजिटल पेमेंटला लोकांनी प्रचंड पसंती दिली आणि या व्यवहारात प्रचंड वाढ झाली. यामध्ये राष्ट्रीय देयके महामंडळाने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने सुरु केलेल्या यूपीआय या सेवेची सर्वात मोठी भूमिका आहे.
मोबाईलचा वापर वाढणार
मोबाईल वॉलेट ऍपच्या माध्यमातून करण्यात येणारे हे सर्व व्यवहार सुरक्षित आणि गतिशिल असल्याने ग्राहक कुठेही हा व्यवहार सहज आणि सोप्या पद्धतीने करू लागला. त्याचा परिणाम डिजिटल पेमेंट सेवा अनेक पटीत वाढली आहे.
काय आहे प्रक्रिया?
यूपीआय पेमेंटसाठी एटीएम मशीनमध्ये थोडेफार बदल करावे लागणार आहेत. यामध्ये एटीएम मशीनमध्ये युपीआय पेमेंटचा पर्याय द्यावा लागेल. एटीएम मशीनच्या स्क्रीनवर क्युआर कोड द्यावा लागेल. ग्राहकाला त्याची इच्छित रक्कम एटीएम मशीनमध्ये नोंदवावी लागेल. त्यानंतर हा क्युआर कोड तुमच्याकडे असलेल्या भीम, गुगल पे, ऍमेझॉन, फोन पे, पेटीएम यापैकी एका युपीआय पेमेंट ऍपद्वारे स्कॅन करावा लागेल. तुमचा पिन टाकावा लागेल. सबमिटचे बटण दाबावे लागेल. त्यानंतर खात्यातील रक्कम वळती होऊन ती एटीएम मशीनमधून रोखीच्या स्वरुपात प्राप्त होईल.
कशातून मिळणार सुटका?
विना डेबिट कार्ड आता बिनधास्त एटीएममध्ये जा. ना कार्ड वापरण्याची गरज ना एटीएमच्या बटनांची आकडेमोड, ना पासवर्ड, ना पिन, फक्त एटीएम स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमची रक्कम टाका. एटीएममधून रक्कम बाहेर येईल.