नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज दिल्लीत विरोधी पक्षांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते बसने जंतरमंतरकडे निघाले होते. परंतु पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना बसमूधन खाली उतरवले. घटनास्थळी मोठी गर्दी जमली. जंतरमंतरवर आंदोलन करण्यावर विरोधक ठाम राहिले. त्यामुळे राहुल गांधींसह खासदार आणि नेतेमंडळींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. रस्त्यावर झोपून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणा-या प्रियंका गांधी आणि इतर महिला खासदार आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आंदोलनस्थळापासून दूर नेले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर हे सर्व खासदार ३ बस भरून २०० पेक्षा जास्त खासदार दिल्लीच्या जंतरमंतर मैदानाकडे निघाले. परंतु या मैदानापासून १०० मीटर अंतरावर पोलिसांनी या बस अडवल्या. पोलिसांनी राहुल गांधींना आंदोलन करण्यापासून अटकाव केल्यानंतर राहुल गांधींनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. प्रियंका गांधीही यावेळी रस्त्यावर आडव्या पडल्या. पोलिसांनी आपल्यासह इतर खासदारांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
जंतरमंतरवर जाणा-या बसेस रोखल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त झाला. पोलिसांनी बसेस अडविण्यासाठी बॅरिकेटिंग केले आणि काही बसेसच्या टायरमधील हवाही काढल्याचे समोर आले. सुमारे दीड तास बसेस पुढे सरकत नसल्याने राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर खासदार बसमधून खाली उतरले. त्यांनी पायीच जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांनाही बॅरिकेटिंग करून पुढे जाण्यापासून रोखले.
या परिस्थितीनंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना त्याच ठिकाणी ठिय्या देण्याचे आवाहन केले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे खासदार अडवलेल्या ठिकाणीच ठिय्या देऊन बसले. दरम्यान, पोलिसांनी राहुल गांधींना आंदोलन करू नये, यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आधी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रियंका गांधी यांच्यासह इतर खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत होते. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आधी काल मंगळवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या घराला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांनी बॅरिकेडस् लावून मोर्चा अडविला. त्यावेळी राहुल गांधी यांच्यासह इतर खासदारांनी आकाशवाणी भवनात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. त्यामुळे गेल्या २४ तासांत पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर खासदारांना दुस-यांदा ताब्यात घेतले.
इंडिया आघाडीच्या मागण्या
-मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा.
-एसआयआर प्रक्रियेत मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत.
-नावे वगळण्यापूर्वी मतदाराला नोटीस आणि अपील करण्याची संधी मिळावी
-ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात
प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी मेडल
जंतरमंतरवर आंदोलनासाठी निघताना राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना माझ्यावर ४५ गुन्हे दाखल आहेत. माझ्यावर १०० गुन्हे दाखल झाले तरी चालेल, ते माझ्यासाठी मेडल आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर देशात विविध भागांत मिळून १८ गुन्हे दाखल होते.
















