पुणे : स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि भ्रष्ट अधिका-यांवर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून वातावरण तापले आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी पुणे पोलिसांनी १५ आंदोलकांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत, पुणे सीपी साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर रोहित पवार थेट फरासखाना पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत.
एस. एम. जोशी पूल परिसरात २ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. आंदोलक तरुणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना जाब विचारला. गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टक-यांची मुले ही महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांना आतंकवादी, दहशतवादी किंवा गुप्तहेर ठरवणा-या पोलिसांचा जाहीर निषेध आहे, असा घणाघात त्यांनी केला. एका लोकप्रतिनिधीच्या नात्याने मीही या आंदोलनात सहभागी झालो होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी माझ्यावर गुन्हे दाखल करा आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
चिथावणीखोर वक्तव्ये करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी १५ जणांवर एफआयआर नोंदवला आहे. मात्र, सरकारने पोलिसी बळाचा गैरवापर करून आंदोलन चिरडण्याचा कट रचल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गंभीर त्रुटी असून, आंदोलनस्थळी नसलेल्यांची नावे टाकण्यासह महिला आंदोलकांना पुरुष आणि पुरुषांना महिला दाखवल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.
















