20.9 C
Latur
Sunday, September 15, 2024
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवा

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवापूर्वी राज्यातील सर्व छोट्या, मोठ्या गावांतील गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणा-या गणेशभक्तांना यंदाही टोल माफी देण्याची घोषणा करताना शिंदे यांनी राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. या वेळी बोलताना शिंदे यांनी राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती या वर्षीही कायम राहील. त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी यÞोजना राबवावी, अशा सूचना केल्या.

गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याच्या कामी हयगय करणा-या अधिका-यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी बैठकीत दिला. राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये. सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनीदेखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही शिंदे यांनी सांगितले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मूर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन शिंदे यांनी बैठकीत केले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रमुख तसेच विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्याचे आवाहनही केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR