30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रअखेर विकास गोगावले पोलिसांना शरण

अखेर विकास गोगावले पोलिसांना शरण

वडिलांच्या मंत्रिपदावर शेकताच मुलगा हजर

महाड (रायगड) : महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणामुळे चर्चेत असलेले आमदार भरत गोगावले यांचा चिरंजीव विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण आला आहे. मागील दीड महिन्यांपासून फरार असलेला विकास गोगावले आज महाड शहर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. न्यायालयाच्या कडक आदेशानंतर त्याने हे पाऊल उचलले आहे.

महाड नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन राजकीय गटांत मोठा राडा झाला होता. या हिंसाचार आणि राडा प्रकरणात विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून विकास गोगावले अटकेच्या भीतीने फरार होता. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी केली होती, मात्र तो सापडला नव्हता.

न्यायालयाचा अल्टिमेटम
विकास गोगावले यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, काल (२२ जानेवारी) न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत, तातडीने पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. मुलावर एवढे गंभीर गुन्हे असताना भरत गोगावले मंत्रिपदी कसे, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. न्यायालयाच्या या आदेशानंतर त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.

राजकीय वातावरण तापले
आमदार भरत गोगावले हे सत्ताधारी पक्षातील वजनदार नेते असल्याने, त्यांच्या मुलाने पोलिसांसमोर केलेले आत्मसमर्पण हा महाडच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. आता पोलीस त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करतील आणि त्यांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR