मुंबई : आषाढी वारीनिमित्त सरकार मानाच्या १० पालख्यांसोबतच ११०९ दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये अनुदान देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
मागील वर्षी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मानाच्या १० पालख्यांसोबत वारीला येणा-या प्रत्येक दिंडीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून प्रत्येक दिंडीला २० हजारांची मदत केली होती. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी राज्य सरकारने वारीसाठी २ कोटी २१ लाख ८० हजारांचे अनुदान मंजूर केले आहे. पंढरपूरला येणा-या मानाच्या १० पालख्यांसोबतच ११०९ दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये दिले जाणार आहेत.
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात वारक-यांच्या सोयीसुविधेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. ६ जुलैला आषाढी वारी असून त्याआधीच अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होता. मुखी हरीनामाचा गजर आणि ग्यानबा तुकाराम जयघोष करत लाखो वारकरी पंढरीला जातात. मात्र याच वारक-यांचा विसर सरकारला पडला का असा प्रश्न विचारला जात होता. मागील वर्षी पंढरपूरला जाणा-या प्रत्येक दिंडीला राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात आली होती परंतु यंदा वारी सोहळा जवळ आला तरी मदत न मिळाल्याने वारकरी नाराज झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणा-या वारक-यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
वारक-यांसाठी सुविधा तातडीने पूर्ण करा
आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारक-यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठक अजितदादांनी घेतली. पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारक-यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.