नांदेड : प्रतिनिधी
कौठा येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग लागल्यामुळे लाखोंच्या नुकसान झाले आहे. सदर घटना १ मे रोजी रात्री उशिरा घडली.
नवीन कौठा परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बापूराव नागोराव खिचडे यांच्या मालकीच्या शिवशंकर मंडप डेकोरेशन गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये लाख रुपयांचे मंडप डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात असून या घटनेबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. मात्र सदर आग कोणत्या कारणाने लागली हे स्पष्ट झाले नव्हते.
घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवानांनी येऊन आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. विशेष म्हणजे मंडपासाठी लागणारे कापडी साहित्य, बांबू यासह सजावटीसाठी वापरल्या जाणा-या साहित्याचा समावेश होता. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत यातील नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू होते.

