Homeमहाराष्ट्रसंगमनेरमधील गडगे महाराजसह पाच जणांना अटक

संगमनेरमधील गडगे महाराजसह पाच जणांना अटक

‘अंनिस’चा सापळा; भोंदूगिरीचा खेळ संपला

अहिल्यानगर : दुर्धर आजार मंत्राने बरे करतो, दैवी चमत्काराने दारू-व्यसन सोडवतो, मूल नसणा-या महिलांना मंत्रोच्चाराने मूल देतो, घरातील समस्या मंत्रशक्तीद्वारे दूर करतो, असा दावा करत भक्तांची आर्थिक फसवणूक करायचा.
असा हा भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे ऊर्फ दत्तधाम सरकारसह त्याच्या पाच सहका-यांविरोधात गुन्हा दाखल करत संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईचे अंनिसने स्वागत केले आहे.

भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे ऊर्फ दत्तधाम सरकार, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगाव पान, ता. संगमनेर) आणि सूरज शिंदे, मधुकर शिंदे (दोघेही रा. रहिमपूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी फिर्याद दिली आहे.

धार्मिक, आध्यात्मिकतेच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक करणा-या राजेंद्र बापू गडगे महाराजाच्या भोंदूगिरीविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रारी अर्ज दिला होता. या तक्रारीचा फिर्यादी ऍड. रंजना पगार-गवांदे यांनी वरिष्ठ पोलिसांपर्यंत पाठपुरावा केला होता. याच दरम्यान, संबंधितांनी सोशल मीडियात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करणारा व्हीडीओ शेअर केला होता.

राजेंद्र गडगेविरोधात राज्यभरातून तक्रारी
राजेंद्र गडगे महाराजाच्या भोंदूगिरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तेथील चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, संगमनेर उपविभागीय अधिकारी तसेच संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR