केर काऊंटी : वृत्तसंस्था
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ग्वाडालुपे नदीला आलेल्या महापुराने मोठा हाहाकार उडाला आहे. या आपत्तीमुळे मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे. केर काउंटीला या पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे १५ मुलांसह ४३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय, आसपासच्या भागांतही अनेकांचा बळी गेला आहे.
ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी केवळ ४५ मिनिटांत २६ फूट वाढली, ज्यामुळे झाडे उन्मळून पडली, वाहने पाण्यात वाहून गेली आणि अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. हजारो घरे जलमग्न झाली आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत ८५० हून अधिक लोकांचे जीव वाचवले आहेत. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ऍबॉट यांनी सांगितले की, बचाव आणि मदत कार्य सतत सुरू आहे. मात्र, स्थानिक नागरिक प्रशासनावर संतप्त असून, पूरासारख्या आपत्कालीन परिस्थितीची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
टेक्सासचे गव्हर्नर डॅन पॅट्रिक म्हणाले की, बचाव पथक काम करत आहे. ज्यामध्ये नऊ बचाव पथके, १४ हेलिकॉप्टर आणि १२ ड्रोनचा आपत्ती निवारण कार्यात वापर केला जात आहे. आतापर्यंत ८५० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. केर्व्हिल जवळील मुलींचे उन्हाळी शिबिर, कॅम्प मिस्टिक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. कॅम्पमधील ७५० मुलींना वाचवण्यात आले. पुरामुळे वीज तारा कोसळल्या आणि केर्विलच्या आसपासच्या भागातील सुमारे २,६०० घरांची वीज खंडित झाली.