21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeपरभणीआरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयास ठोकले टाळे

आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयास ठोकले टाळे

आ. डॉ. राहूल पाटील यांना अटक
परभणी : मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन करत त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आ.डॉ. पाटील यांच्यासह या आंदोलनात सहभाग नोंदवणा-या अन्य आमदारांना देखील अटक करून ताब्यात घेतले आहे. यावेळी अटक करण्यात आलेल्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध नोंदवला.

मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शासनाने अद्यापही यावर तोडगा काढला नसल्याने संपूर्ण राज्यात आंदोलन तीव्र झाले आहेत. आ. डॉ.पाटील हे सातत्याने मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी दोन वेळा राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी देखील केली आहे.

तसेच या प्रश्नावर मा. राष्ट्रपती महोदयांना देखील मराठा व धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे. एवढेच नव्हे तर मराठा व धनगर आरक्षणावर तात्काळ निर्णय घेतला जात नसल्याने आमदार डॉ. पाटील आक्रमक झाले आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण केले होते.

त्यानंतर बुधवारी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नसल्याने संतप्त होत थेट मंत्रालयाला कुलूप लावले तसेच जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात आ. सुरेश वरपूडकर, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. राजू नवघरे, आ. कैलास पाटील, आ.विक्रम काळे, आ.चेतन तुपे, आ. बाबासाहेब आजबे, आ. निलेश लंके, आ. बाळासाहेब पाटील, आ. मोहन हंबर्डे, आ. यशवंत माने आदिंनी देखील सहभाग नोंदवला होता. या सर्व आमदारांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले.

सरकारची कृती म्हणजे दडपशाही : आ. डॉ. पाटील
मंत्रालयाच्या समोर शांततेत आंदोलन सुरू होते. परंतू पोलिसांनी दडपशाही करून माझ्यासह अन्य आमदारांना अटक करून ताब्यात घेतले. सरकारची ही कृती म्हणजे दडपशाही असून या घटनेचा निषेध नोंदवत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच मराठा व धनगर आरक्षण भेटत नाही तोपर्यंत विविध प्रकारे आंदोलन सुरूच राहतील असे यावेळी आ.डॉ. पाटील यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR