अयोध्या : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. ट्रस्टने प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नियुक्ती करण्यासोबतच नव्या सरचिटणीसाची आणि तीन विश्वस्तांची नियुक्ती केली. राम मंदिरातील देणगी चोरीच्या आरोपांनंतर सुरू झालेल्या चौकशा, अटकसत्र आणि तत्कालीन सरचिटणीस चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी हे बदल करण्यात आले आहेत. राम मंदिर विश्वस्तपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.
ट्रस्टच्या महत्त्वाच्या पदांपैकी माजी कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्यावर आता सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी पूर्णवेळ सरचिटणीस म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली आहे. ट्रस्टच्या बैठकीत जितेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे ट्रस्टच्या दैनंदिन व्यवस्थापनात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत विश्वस्तांच्या नेतृत्वाखाली चालणा-या व्यवस्थापनात आता व्यावसायिक आणि कॉर्पोरेट पद्धतीच्या देखरेखीला महत्त्व मिळणार आहे. मंदिराची सुरक्षा, लॉजिस्टिक्स, भाविकांची गर्दी व्यवस्थापन तसेच कोट्यवधी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदा-यांवर सीईओ लक्ष ठेवणार आहेत. बैठकीनंतर कृष्ण मोहन यांनी ही माहिती दिली. मात्र, ट्रस्टसाठी प्रवक्त्याची नियुक्ती करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तीन नव्या विश्वस्तांची नियुक्ती
ट्रस्टने तीन नव्या विश्वस्तांचीही नियुक्ती केली आहे. यामध्ये दिल्लीस्थित व्यावसायिक महेश भगचंदका, अयोध्येचे रहिवासी आणि १९९३ पासून राम जन्मभूमी प्रकरणात न्यायालयीन लढा देणारे माजी अतिरिक्त महाधिवक्ता मदन मोहन पांडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीर्घकाळ कार्यकर्त्या तसेच शिकोहाबाद येथील पी. जी. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या निर्मला यादव यांचा समावेश आहे. निर्मला यादव या राम मंदिर ट्रस्टमध्ये नियुक्त होणा-या पहिल्या महिला विश्वस्त ठरल्या आहेत.
















