जिंतूर : लग्नानंतर सात-आठ महिन्यातचं आलेलं वैधव्य पण ती खचली नाही. जिद्दीने उभे राहिली. मनाचा ठाम निर्धार केला लढायचं. लढली आणि पोलिस झाली.
ही संघर्षकथा आहे जिंतूर तालूक्यातील वस्सा परिसरातील शहापूर येथिल शेतकरी कन्या निकिता काशिनाथराव गिलबिलेची. जी अकाली वैधव्यानंतर खचली नाही. काहीही झालं तरी स्वाभिमानाने उभं राहायचं, मग काय वडिलांनी, भावाने प्रोत्साहन दिले तिने गाव सोडले आणि थेट छ. संभाजीनगर गाठले. एव्हाना मनाने ठरवून टाकले होते स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. अधिकारी व्हायचे. कुढत बसायचे नाही. इतक्यात पोलिस भरती निघाली. ही संधी आहे असे समजुन तीने तयारी केली. शेवटी कष्टाला फळ मिळाले. पहिल्याचं प्रयत्नात गोंदिया येथिल पोलिस भरतीत तिची पोलिस म्हणून निवड झाली.
निकिता येथिल म.फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. निकिताने प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला. वैधव्याच्या रुपाने संकटाचा डोंगर कोसळला. ती अजिबात डगमगली नाही. नियोजनबद्ध अभ्यास आणि खडतर परिश्रम, आई – वडिल व भावाचे प्रोत्साहन या बळावर निकिता पोलिस दलात भरती झाली. आपले स्वप्न तिने वास्तवात आणले. गोंदिया पोलिस दलात लवकरचं ती रुजु होणार आहे. तिच्या जिद्दीला सलाम.
अधिकारी व्हायचे आहे : निकिता गिलबिले
मी पोलिस पदावर समाधान मानणार नाही? मला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे आहे. मुलींनी नेहमी आपली जिद्द कायम ठेवावी. परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते असे मत निकिता गिलबिले हिने व्यक्त केले आहे.