नागपूर : नागपूर येथील अॅड. मेहरोज अश्रफ खान पठाण, अॅड. राज दामोदर वाकोडे, अॅड. नंदेश शंकरराव देशपांडे व अॅड. रजनीश रत्नाकर व्यास, या चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या सर्वोच्च कॉलेजियमने यासंदर्भात काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारला सादर केलेला प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आला. अॅड. मेहरोज खान पठाण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये राज्य सरकारचे वकील आहेत, तर अॅड. नंदेश देशपांडे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (केंद्र सरकार) आहेत. अॅड. राज वाकोडे व अॅड. रजनीश व्यास खासगी वकिली करतात, तसेच अॅड. वाकोडे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ व महावितरण कंपनीचे स्थायी अधिवक्ता आहेत. या चारही विधिज्ञांना वकिली व्यवसायाचा दीर्घ अनुभव आहे.
अॅड. वाकोडे २००४, अॅड. देशपांडे १९९७, तर अॅड. व्यास २००१ पासून या व्यवसायात कार्यरत आहेत. यादरम्यान त्यांनी संवैधानिक, दिवाणी, फौजदारी इत्यादी प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. त्यांची आतापर्यंतची यशस्वी कारकीर्द लक्षात घेता, त्यांना अतिरिक्त न्यायमूर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१४ वकिलांचा समावेश
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील चौघांसह एकूण १४ वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार इतरही वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अॅड. संदेश पाटील, अॅड. श्रीराम सिरसाट, अॅड. रणजीतसिंह राजा भोसले, अॅड. आशिष चव्हाण, अॅड. फरहान दुबाश, अॅड. आबासाहेब शिंदे, अॅड. हितेन वेणेगावकर, अॅड. अमित जामसांदेकर, अॅड. वैशाली पाटील-जाधव व अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांचा समावेश आहे.
















