Homeनांदेडनांदेडात २४ तासांत चौथा खून

नांदेडात २४ तासांत चौथा खून

मुरमुरा गल्लीतील घटना, दोघे ताब्यात

नांदेड : प्रतिनिधी
शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण गँगवॉरमध्ये तिघांचा खून झाला. या घटनेचा तपास सुरू असतांनाच अवघ्या २४ तासांत म्हणजेच शनिवारी रात्री चौथ्या खुनाची घटना घडली. जुना मोंढालगतच्या मुरमुरा गल्लीत ही घटना घडली असून या प्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान एका पाठोपाठ होणा-या खुनाच्या घटनांमुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

निळा रोडवरील कॅनॉल परिसरातील ई-स्क्वेअर परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या गँगवारमध्ये तिन जणांची हत्या करण्यात आली. या रक्तरंजित खेळाने नांदेड जिल्हा हादरून गेला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाचा ताण यामुळे वाढले आहे. या प्रकणाचा तपास आणि आरोपींचा शोध सुरू असतांनाच खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या २४ तासात म्हणजेच शनिवारी रात्री चौथ्या खुनाची धक्कादायक घटना घडली आहे.

जुना मोंढालगत असलेल्या मुरमुरा गल्लीत रात्री उशिरा अंदाजे ३२ वर्षीय रणजीत सिंह तबेलेवाले उर्फ रज्या मुंबई यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी धारदार तलवारीने त्यांच्या तोंडासमोर व शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा खून जुन्या वादातून झाल्याचे समोर येत आहे. घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच रविवारी पहाटे या गुन्ह्यातील मनप्रितसिंग परविंदरसिंग काचवाले वय २३ व परमज्योतसिंग परविंदरसिंग काचवाले २५ दोघेही रा. नांदेड या दोघांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे, असे वजीराबाद ठाण्याचे पोनि कदम यांनी सांगीतले.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
शहरात वाढणारी गुन्हेगारी, वाळू, गुटखा माफियांचे वर्चस्व आणि गँगवॉरमधून सलग घडणा-या या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी शहरासह जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR