हैदराबाद : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला ६ हमी दिली होती. या ६ हमीपैकी एक असलेली महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना तेलंगणात सुरु करण्यात आली आहे. सरकारी मालकीच्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये शनिवारी दुपारपासून हा निर्णय लागू होणार आहे. काँग्रेसने महिला आणि ट्रान्सजेंडरना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला.
सरकारी आदेशात म्हटले आहे की, तेलंगणा सरकारने महालक्ष्मी’ योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत तेलंगणातील रहिवासी सर्व वयोगटातील मुली आणि महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती तेलंगणाद्वारे चालवल्या जाणार्या बसमधून विनामूल्य प्रवास करू शकतात. तेलंगणा राज्याच्या हद्दीत ९ डिसेंबर दुपारपासून ग्रामीण सेवेत आणि एक्सप्रेस बसने कुठेही प्रवास करू शकतात. सराकारी आदेशात म्हटले आहे की, महिला प्रवाशांचे भाडे राज्य सरकार तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाला देईल.
‘राजीव आरोग्यश्री’ची हमीही पूर्ण
काँग्रेस सरकारने गुरुवारी आपल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत महिलांसाठी मोफत प्रवास आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजीव आरोग्यश्री’ आरोग्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘राजीव आरोग्यश्री’ अंतर्गत १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल.
‘प्रजा दरबार’ आयोजित
तेलंगणाचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ए. रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या कॅम्प ऑफिस-सह-सरकारी निवासस्थानी ‘प्रजा दरबार’ आयोजित केला आणि सामान्य लोकांच्या तक्रारी ऐकल्या. तसेच त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. जोतिराव फुले प्रजा भवन येथे प्रजा दरबारासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.