नवी दिल्ली : देशभरात ई २० पेट्रोलबाबत चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विविध विधानांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सुरुवातीला ई २० हे भविष्यातील इंधन असल्याचा दावा, त्यानंतर वाहन खराब झाल्याचा एकही पुरावा नसल्याचे आव्हान, नंतर या विषयाचा आपल्या मंत्रालयाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण आणि आता संसदेत ई २० मुळे काही वाहनांचे मायलेज २ ते ६ टक्क्यांनी कमी होऊ शकते, अशी कबुली दिल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
राज्यसभेत नुकत्याच दिलेल्या उत्तरात गडकरी यांनी २००५ ते २०१६ दरम्यान उत्पादित बीएस-३ वाहनांमध्ये ई २० वापरण्यासाठी काही रबरचे पार्ट्स, सील आणि गॅस्केट बदलावे लागू शकतात, असे सांगितले. जुन्या वाहनांमध्ये वापरलेले काही रबर आणि प्लास्टिकचे भाग जास्त इथेनॉल असलेल्या इंधनाशी दीर्घकाळ सुसंगत नसल्याने कालांतराने त्यांची झीज होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर संसदेत गडकरी यांनी आणखी एक महत्त्वाची बाब मान्य केली. त्यांनी सांगितले की, ई २० पेट्रोल वापरल्यास वाहनांच्या मायलेजमध्ये २ ते ६ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. मात्र, ही घट प्रत्येक वाहनात सारखी असेलच असे नाही. वाहनाचे इंजिन, तंत्रज्ञान आणि वय यानुसार त्यात फरक पडू शकतो. ई २० पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चेदरम्यान गडकरी यांनी टीकाकारांना खुले आव्हान दिले होते. ई २० मुळे एकही वाहन खराब झाले असेल तर त्याचे उदाहरण द्या असे ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर ई २० विरोधात चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही केला होता. यानंतर सरकारने मारुती सुझुकी, टोयोटा, बजाज ऑटो, टीव्हीएस यांसारख्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन केली होती. या समितीने ई २० मुळे वाहनांना कोणताही मोठा धोका नसल्याचे मत व्यक्त केले होते.
भविष्यातील इंधन म्हणून समर्थन
गेल्या वर्षी पुण्यात आयोजित वर्ल्ड बायोफ्यूल डे कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रित इंधनाला भारताच्या ऊर्जा सुरक्षेचे भविष्य असल्याचे सांगितले होते. त्यांनी ई २० ला फ्यूचरचे फ्यूल संबोधत, भविष्यात डिझेलमध्येही जैवइंधनाचा वापर वाढवण्यावर भर दिला होता.
ई २० माझ्या मंत्रालयाचा विषय नाही
यानंतर न्यायालयीन सुनावणीदरम्यान नितीन गडकरी यांनी ई २० धोरणाचा संबंध त्यांच्या मंत्रालयाशी नसून तो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित येतो, असे स्पष्ट केले. कायदेशीरदृष्टया हे विधान योग्य असले, तरी ई २० चा सर्वाधिक प्रचार करणा-या प्रमुख नेत्यांपैकी गडकरी असल्याने या वक्तव्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले.
जुन्या वाहनांमध्ये काही पार्ट्स बदलावे लागू शकतात
मायलेज २ ते ६ टक्क्यांनी कमी होण्याची कबुली
जुन्या वाहनधारकांसाठी चिंता
सरकारने आता स्पष्ट केले आहे की, २००५ ते २०१६ दरम्यानच्या बीएसइ ३ वाहनांमध्ये रबर पाइप, सील आणि गॅस्केट यांसारख्या भागांवर ई २० चा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा वाहनधारकांनी आवश्यक तांत्रिक तपासणी करून गरज भासल्यास संबंधित पार्ट्स बदलण्याचा विचार करावा.
स्पष्ट मार्गदर्शक सूचना नाहीत
ई २० पेट्रोलचा वापर कोणत्या वाहनांसाठी योग्य आहे, जुन्या वाहनधारकांनी काय करावे आणि भविष्यात कोणत्या प्रकारचे वाहन खरेदी करावे, याबाबत सरकारकडून स्पष्ट आणि अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे. तोपर्यंत ई २० संदर्भातील चर्चा आणि संभ्रम कायम राहण्याची शक्यता आहे.
















