नवी दिल्ली : पित्ताशयाचा कर्करोग हा एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोग आहे. जो पित्ताशयामध्ये विकसित होतो. पित्ताशयाचा कर्करोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येत नाही म्हणून त्याला सायलेंट किलर म्हटले जाते. म्हणूनच याबाबत जागरूकता, वेळीच निदान आणि उपचार गरजेचे आहे. पित्ताशयाचा कर्करोग कर्करोगाचा एक दुर्मिळ प्रकार आहे. पित्ताशय हा यकृताखालील एक लहान अवयव आहे, जो पित्त साठवतो आणि बाहेर सोडतो. ब-याचदा त्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे दिसून येतात. निदानास विलंब झाल्यास उपचार पर्याय देखील मर्यादित होतात.
पित्ताशयाचे खडे आणि पित्ताशयाचा कर्करोग ही देशातील आरोग्यविषयक चिंतेची बाब ठरत आहे. भारतात पित्ताशयाचा कर्करोग आणि पित्ताशयातील खडे ही एक गंभीर समस्या आहे आणि संपूर्ण जगभरातील एकुण प्रकरणांपैकी १०% प्रकरणे केवळ भारतात आढळून येतात. उत्तर, ईशान्य, मध्य आणि पूर्व भारतात हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. पश्चिमेकडील देशांच्या विपरीत, भारतात पित्ताशयाचा कर्करोग तरुण व्यक्तींना प्रभावित करतो, ५० ते ६० वयोगटातील व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्वरित निदान आणि उपचारांसाठी कर्करोगाची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. पित्ताशयाचे खडे खूप सामान्य असले तरी, पित्ताशयाचा कर्करोग तुलनेने दुर्मिळ आहे.
पित्ताशयाचे खडे किंवा पित्ताशयाचा सूज असलेल्या बहुतेक लोकांना कर्करोग होत नाही. तथापि, पित्ताशयाच्या आजाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये, विशेषत: पित्ताशयाच्या खड्यांचा इतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये, पित्ताशयाचा कर्करोग होण्याचा धोका हा पित्ताशयाच्या खडे नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत पाच पटीने अधिक आहे.
काय आहेत लक्षणे?
– ओटीपोटाच्या वरील उजव्या बाजूस सतत वेदना
– मळमळ किंवा उलट्या
– कावीळ (त्वचा आणि डोळे पिवळे होणे)
– अचानक वजन कमी होणे
– ताप, थोडेसे खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखे वाटणे, पोटात गाठ
उपचार काय आहेत?
कर्करोगाचे निदान कोणत्या टप्प्यावर झाले आहे यावर उपचार अवलंबून असतात. सुरुवातीच्या काळात, जवळच्या ऊतींसह पित्ताशयाचे खडे शस्त्रक्रियेने काढून टाकणे बरे होऊ शकते. जर कर्करोग पसरला असेल, तर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरेपी, पॅलिएटिव्ह केअर यासारखे उपचार पर्यायांचा आधार घ्यावा लागेल. तुमची तपासणी करुन मगच डॉक्टर उपचारांची पद्धत ठरवतात.
वेळीच निदान आवश्यक
पित्ताशयाचा कर्करोग लवकर बरा होण्यासाठी वेळीच निदान आवश्यक आहे. पित्ताशयाचे खडे, पित्ताशयाच्या दीर्घकालीन समस्या किंवा पोटाच्या समस्यांची अस्पष्ट लक्षणे असलेल्या कोणालाही त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच मदत घ्यावी. नियमित तपासणी आणि जागरूकता तुम्हाला या आजारापासून दूर राहण्यास मदत करते.
















