मुजफ्फरपूर : राष्ट्रीय पात्रता प्रवेशपरीक्षा पदवीपूर्व (नीट-यूजी)सह विविध स्पर्धा परीक्षांच्या बनावट प्रश्नपत्रिका विकून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणा-या टोळीतील चौघांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. मुजफ्फरपूर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांची ओळख हर्ष, अमन कुमार, कन्हैया कुमार आणि हर्ष कनोडिया अशी झाली आहे. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाइल फोनची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. मुजफ्फरपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कांतिश कुमार मिश्रा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की २ जून रोजी सिकंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालू घाट परिसरातून मनीष झा याला याच प्रकारच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
त्यानंतर शनिवारी त्याच्या आणखी चार साथीदारांना अटक केली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने बुधवारी संसदीय समितीची भेट घेतली असून त्यांनी परीक्षा प्रणाली सुरक्षित करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. या बैठकीत एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह आणि नॅशनल मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष अभिजात शेठ उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी सूचना केली की, आपण अमेरिका आणि चीनसारख्या देशांकडून शिकले पाहिजे. तिथे कोणत्याही तक्रारीशिवाय परीक्षा होतात. परदेशात वापरल्या जाणा-या चांगल्या पद्धतींपासून शिका आणि अशी प्रणाली (सिस्टम) अवलंबवा जेणेकरून देशातील परीक्षा व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत होईल.
पालकांच्या फसवणुकीची पद्धत काय होती?
आरोपी सामाजिक माध्यमांचा वापर करून विद्यार्थी आणि पालकांना जाळ्यात ओढत होते. ते विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा दावा करत होते. या आमिषाला बळी पडलेल्या व्यक्तींकडून आरोपी ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारत होते. जमा झालेली रक्कम नंतर मनीष झा याच्याकडे पाठविली जात होती.
















