चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेली DMK आणि AIADMK या दोन मोठ्या द्रविडीयन पक्षांची मक्तेदारी मोडीत काढत, अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय (थलापती) आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सकाळी १० वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांचा समावेश
विजय यांच्या मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसोबतच तरुण आणि नवीन चेहऱ्या संधी देण्यात आली आहे. विशेषतः २९ वर्षीय एस. कीर्तना यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. कीर्तना या शिवकाशी मतदारसंघातून निवडून आल्या असून, त्या सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेतील.
विजय यांच्यासोबत आज ९ आमदार मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील
१. ‘बसी’ एन. आनंद (टी. नगर)
२. आधव अर्जुना (विल्लिवाक्कम)
३. के. ए. सेंगोट्टायन (गोबीचेट्टीपलायम)
४. एस. कीर्तना (शिवकाशी)
५. के. जी. अरुणराज (तिरुचेंगोडू)
६. पी. व्यंकटरमणन (मायलापूर)
७. सी. टी. आर. निर्मलकुमार (तिरुप्परनकुंद्रम)
८. ए. राजमोहन (एगमोर)
९. टी. के. प्रभू (कराईकुडी)
सत्तेचे समीकरण
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या TVK पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ आकड्यासाठी काँग्रेस (५ जागा), CPI, CPI(M), VCK आणि IUML या पक्षांनी पाठिंबा दिला असून, विजय यांच्याकडे आता १२० आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले असून १३ मे पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
















