नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण नाणेफेकीनंतर गिलनं ही चर्चा व्यर्थ ठरवत कोणत्याही बदला शिवाय मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीच्या मैदानातील नाणेफेकीचा नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि शुबमन गिल नकोशा विक्रमाची बरोबरी करण्यापासून वाचला. इंग्लंड दौ-यातील तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेतून शुबमन गिलने कसोटीत कॅप्टन्सीच्या रुपात नव्या इनिंगला सुरुवात केली. इंग्लंड दौ-यात त्याला एकाही कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकता आली नव्हती. त्यानंतर अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातही गिल नाणेफेकीच्या वेळी कमनशिबी ठरला.
सलग सहाव्यांदा त्याने नाणेफेक गमावली. पण सातव्या कसोटी सामन्यात खास लक फॅक्टर त्याच्या कामी आला अन् नाणेफेकीतील पराभवाच्या ‘सिक्सर’ नंतर शुबमन गिल अखेर टॉस जिंकला. जर त्याने हा टॉस गमावला असता तर कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्या सात सामन्यात सलग टॉस गमावण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला असता. शुबमन गिल हा क्रिकेटच्या मैदानात ७७ क्रमांकाची जर्सी घालून मिरवतो.
शुबमन गिल याला अंडर १९ पासून ७ क्रमांकाची जर्सी घालायची होती. कारण हा क्रमांक तो स्वत:साठी लकी मानतो. ७ क्रमांकाची जर्सी उपलब्ध नसल्यामुळे त्याने ७७ क्रमांकाची जर्सी घालण्याचा पर्याय निवडला. आता कसोटीतील कॅप्टन्सीच्या रुपात सातवा सामना खेळताना त्याने पहिल्यांदा टॉस जिंकला. ही गोष्ट म्हणजे लक फक्टर खरंच त्याच्या कामी आला हेच दाखवून देणारी आहे.

