मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याचा फटका कृषी विभागालाही बसला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांसाठी कृषी समृध्दी योजनेची घोषणा केली. पण त्यांची पूर्तता होत नाही. या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे पुरवणी मागण्याव्दारे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
नवीन पीक विमा योजना घोषित करताना राज्य सरकारच्या होणा-या बचतीमधून शेती भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन शासनाने शेतक-यांना दिलेले आहे. जुनी पीक विमा योजना रद्द करताना बचतीचे पैसे शेतक-यांना कृषी समृध्दी योजनेतून देण्यात येतील, असे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मी स्वत: कृषी मंत्री या नात्याने मी जाहीर भाषणांव्दारे शेतक-यांना दिले होते, याची आठवण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांना या पत्राव्दारे करून दिली.
या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे, अशा परिस्थितीत शेतक-यांच्या पाठिशी शासन म्हणून खंबीरपणे पाठिशी उभे राहाणे गरजेचे आहे. शेतक-यांना पुन्हा उभारी देण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजने अंतर्गत जास्तीत जास्त लाभ देणे आवश्यक आहे. शेतक-यांंना आश्वासित केल्याप्रमाणे कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून न दिल्यास शेतक-यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे याचा संपूर्ण विचार करता कृषी विभागाला पुरवणी मागण्यांव्दारे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्यानंतर आता कृषी समृध्दी योजनेसमोर आता आर्थिक संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

