पंढरपूर – यंदाच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकभक्त पंढरीत आहेत. यंदा प्रथमच रेकॉर्ड ब्रेक अशी वारी भरली आहे. दरवर्षी आषाढी यात्रा सोहळ्याची सांगता गोपाळपूर येथील गोपाळकाल्याने होत असतो. यावर्षी गुरुवारी (ता.१०) गुरुपौर्णिमा असून त्या दिवशी गोपाळकाल्याचा उत्सव गोपाळपूरात पार पडत आहे. या उत्सवासाठी गोपाळपूर नगरी सज्ज झाली आहे. गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात याकरता काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे.
गोपाळकाला उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच पुष्पाताई बनसोडे, उपसरपंच लक्ष्मण लेंगरे, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी विठ्ठल भक्तांसाठी परिश्रम घेत आहेत. दरम्यान जिल्ह्यात प्रथमच गोपाळपूर ग्रामपंचायतने प्लास्टिक संकलन केंद्र उभारले असून प्लास्टिक करचऱ्याचा योग्यरित्या विल्हेवाट लावली जात आहे, याचबरोबर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून पाणीपुरवठा, रंगरंगोटी आदी महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. ज्या ठिकाणी प्रमुख संतांच्या पालख्या विसाविणार आहेत त्या ठिकाणच्या कट्ट्यांना विविध संतांची नावे देण्यात आली आहेत.
गोपाळकाला पालखी तळाचे देखील सुशोभीकरण करण्यात आले आहे. गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला असे म्हणत वारकरी भाविक भक्त काल्याचा प्रसाद घेऊन आपापल्या घराकडे परतत असतात. त्या नंतर खऱ्या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता होत असते. दरम्यान भाविकांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत सज्ज झाल्याचे पहावयास मिळत आहे. गोपाळकाला उत्सवासाठी माजी सरपंच विलासकाका म्हस्के, माजी सरपंच उज्वलाताई बनसोडे, माजी उपसरपंच उदय पवार, माजी उपसरपंच विक्रम असबे, माजी उपसरपंच सविताताई आसबे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग देवमारे, इकबाल कांबळे, सदस्या गोदाबाई सुरवसे, कमलाक्षी गुरव, मनीषा आसबे, सीमाताई म्हेत्रे, राहुल माने, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजीराजे असबे, पोलीस पाटील गुंडेश्वर पाटील यांच्यासह गोपाळपूर ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
















