मुंबई : प्रतिनिधी
परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागणीनंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी पुस्तिका छापण्यात आली आहे.
रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी नवीन पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रत्येक रिक्षा चालकाला हे पुस्तक मराठी शिकवण्यासाठी दिले जाणार आहे. या पुस्तकात प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे शब्दप्रयोग देण्यात आले आहेत.
यामुळे रिक्षा चालकांना लवकरात लवकर मराठी भाषा शिकण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र माझा… मराठी माझी बोली भाषा..! सौजन्यशील सेवा… प्रवाशांच्या मनात विश्वासाची आशा असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
दरम्यान, राज्यात सध्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. हजारो रिक्षा-टॅक्सी चालक ‘महाराष्ट्र गीत’गाणार आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे हजारो चालक ‘महाराष्ट्र गीत’चे सामूहिक गायन करणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या मराठी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व भाषिक रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक एकत्र येत ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

