परभणी : सेलू पोलिस स्टेशन हद्दीत धान्य चोरीस गेल्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा परभणीच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या २४ तासांत अंतरराज्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने चौकशीत साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून १ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तपासात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील ३ गुन्हे निष्पन्न झाले आहेत. सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत दहा गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणातील तपास दरम्यान आरोपीकडून ४९ हजारांचे हळदीचे १० कट्टे, ५० हजार ४०० रुपयांचे तुरीचे ८ कट्टे तसेच ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख ४९ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने अवघ्या २४ तासांत आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणी सागर सुंदर काळे (वय २०) धंदा मजुरी, रा. सेलू, जि. परभणी यास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २५), करण शाम पवार (१९ वर्षे) धंदा मजुरी, दोघेही रा. सेलू जि. परभणी यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा परभणी पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यात पोलिस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोह. मुकेश बुधवंत, विलास सातपुते, पांडुरंग तूपसुंदर, पोशी. उमेश चव्हाण, चालक उत्तम हनवते, महारुद्र सपकाळ यांचा सहभाग होता.
















