लातूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या नॅरोगेज रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक वास्तूला हेरिटेज दर्जा देऊन या ठिकाणी भारतीय रेल्वेच्या इतिहासाचे संग्रहालय विकसित करावे, अशी मागणी मध्य रेल्वे सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात निलेगावकर यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. लातूर शहरातील हे नॅरोगेज रेल्वे स्थानक १ मे १९११ रोजी स्थापन झाले होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही ऐतिहासिक वास्तू तब्बल ११५ वर्षांचा इतिहास जपत आहे. सन २००६ मध्ये लातूर शहरात ब्रॉडगेज रेल्वे सेवा नव्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जुन्या नॅरोगेज स्थानकाचा वापर बंद झाला.
लातूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या इतिहासात या रेल्वे स्थानकाला महत्त्वाचे स्थान असून, या वास्तूचे जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जुन्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीला हेरिटेज दर्जा देऊन त्याचे संवर्धन करावे, तसेच तेथे भारतीय रेल्वेच्या इतिहासाशी संबंधित वस्तू, छायाचित्रे व माहितीचे संग्रहालय उभारावे, अशी मागणी निलेगावकर यांनी केली आहे.
या परिसरात जुन्या नॅरोगेज रेल्वेची वाफेवर चालणारे इंजिन उभारल्यास लातूरच्या रेल्वे इतिहासाला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त होईल. यामुळे नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि रेल्वेप्रेमींसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरू शकते, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जुन्या रेल्वे स्थानकाची इमारत व परिसराची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्याच्या संवर्धन व विकासासाठी फिजिबिलिटी रिपोर्ट (व्यवहार्यता अहवाल) तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या मागणीची प्रत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांना देण्यात आली आहे. लातूरच्या रेल्वे इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तूचे जतन झाल्यास शहराच्या ऐतिहासिक वारशात महत्त्वाची भर पडणार आहे.
















