22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रनवरात्रोत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, ३ वर्षांत पूर्ण करणार

नवरात्रोत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, ३ वर्षांत पूर्ण करणार

मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

मुंबई : श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन-साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या अनुषंगाने मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये प्रताप सरनाईक बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला आहे. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

धार्मिक प्रथा-परंपरांचा आदर राखण्यात यावा
हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी मंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिका-यांना दिल्या. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा-परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR