नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नोव्हेंबर महिन्यात भारत सरकारच्या तिजोरीत वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून १.७० लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. गतवर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये जीएसटी कलेक्शन १.६९ लाख कोटी रुपये होते. गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन वाढले आहे. मात्र, ऑक्टोबर २०२५ च्या तुलनेत जीएसटी कलेक्शन घटले आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनंतर जीएसटी परिषदेने २२ सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कराच्या स्लॅबमध्ये बदल केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळीसारखे सण होते. त्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने सरकारला जीएसटीच्या रुपात मोठी रक्कम मिळाली होती. ऑक्टोबरमध्ये सरकारला जीएसटीतून १.९६ लाख कोटी रुपये मिळाले होते. नोव्हेंबर महिन्यात खरेदी कमी झाल्याने वस्तू आणि सेवा करातून मिळणारी रक्कमदेखील कमी झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न २.३ टक्क्यांनी कमी होत १२४२९९ कोटी रुपये झाले आहे. जीएसटी दरातील कपातीनंतर हे बदल झाले आहेत. सीजीएसटी ३४८४३ कोटी रुपये, राज्याचा जीएसटी ४२५२२ कोटी आणि इंटिग्रेटेड जीएसटी ४६९३४ कोटी रुपये जमा झाला आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात आयातीतून उत्पन्न १०.२ टक्क्यांनी वाढून ४५९७६ कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे एकूण सकल जीएसटी महसूल १७०२७६ कोटी रुपये झाला. जो नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत ०.७ टक्के अधिक आहे. रिफंडचा विचार केला तर देशांतर्गत रिफंड ८७४१ कोटी रुपये आहे तर निर्यातीचा विचार केला तर जीएसटी रिफंड ९४६४ कोटी रुपये आहे.
दोन्ही एकत्र केल्यास नोव्हेंबरमधील जीएसटी रिफंड १८१९६ कोटी रुपये आहे. रिफंड समायोजित केल्यानंतर देशांतर्गत जीएसटी महसूल १.५ टक्क्यांनी घटून ११५५५८ कोटी रुपये होतो. निर्यात आणि आयातीमधील नेट कलेक्शन ११.६ टक्क्यांनी वाढले आहे. ते ३६५२१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ मधील नेट जीएसटी ७.३ टक्क्यांनी वाढून १२.७९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कॉम्पेनसेशन सेस कलेक्शनमध्ये घसरण
नोव्हेंबर २०२५ मध्ये कॉम्पेनसेशन सेस कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. देशांतर्गत सेस कलेक्शन गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात १२३९८ कोटी रुपयांवरून कमी होऊन ४७३७ कोटी रुपये झाले आहे. नेट सेस उत्पन्न कमी होऊन ४००६ कोटी रुपये राहिले आहे.
सकारात्मक ग्रोथ चार्टमध्ये केरळ राज्याची आघाडी
नोव्हेंबर २०२५ मध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये राज्यवार विश्लेषण पाहिले असता राज्यांची कामगिरी संमिश्र राहिली. केरळ राज्य सकारात्मक ग्रोथ चार्टमध्ये सर्वात पुढे राहिले. केरळमध्ये एसजीएसटीमध्ये ७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. महाराष्ट्रात एसजीएसटीत ३ टक्क्यांची वाढ दिसून आली. बिहारमध्ये १ टक्क्यांची वाढ झाली आहे.

