26.2 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeराष्ट्रीयस्वातंत्र्यदिन उत्सवासाठी देशभरातून निमंत्रित पाहुणे

स्वातंत्र्यदिन उत्सवासाठी देशभरातून निमंत्रित पाहुणे

विकसित भारत ही संकल्पना, निमंत्रितांमध्ये राज्यातील १२३ जण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१५ ऑगस्ट २०२४ रोजी देश आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील सुप्रसिद्ध लाल किल्ल्यावरून या उत्सवाचे नेतृत्व करतील. ‘विकसित भारत’ ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची संकल्पना आहे. या निमित्ताने नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन २०२४ च्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारने देशभरातील विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १२३ मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे.

विशेष पाहुण्यांमध्ये समाजाच्या विविध स्तरांमधील व्यक्तींचा समावेश असून यामध्ये महिला, युवा, शेतकरी, आदिवासी समाजाच्या व्यक्ती, विविध क्षेत्रांमधील अधिकारी, सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, मायजीओव्ही स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष निमंत्रितांसह विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचा समावेश आहे. दिल्लीतील प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्रातील वाशिम, संभाजीनगर व नाशिक जिल्ह्यातील व्यक्तींना खास निमंत्रण मिळाले आहे.

निमंत्रित व्यक्तींपैकी अनेक जण दिल्लीला प्रथमच भेट देणार असून, दिल्लीमधील स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला. स्वयंसहाय्यता गटाच्या उपक्रमात सहभागी होऊन मी लखपती दीदी बनले आहे. मी केवळ आर्थिक स्वातंत्र्यच मिळवले नाही तर आता मी माझ्या कुटुंबाला आधार देत आहे, असे वाशिम जिल्ह्यातील शहापूर, मंगरुळपीर येथील अर्चना खडसे यांनी म्हटले आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल गावामधील कल्पना देशमुख यांनी मी पुण्यामध्ये ड्रोन दीदी बनण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आता शेतक-यांना त्यांच्या शेतात फवारणी करायला मदत करते, ्से म्हटले.

नाशिक, बुलडाण्यासह संभाजीनगरचे प्रमुख पाहुणे
नाशिक जिल्ह्यामधील सुरगाणा तालुक्यातील हातरुंडी येथील शिक्षक विठ्ठल चौधरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी येथील शिक्षिका सारिका जैन, बुलडाणा जिल्ह्यातील पुष्कर पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आले. या विशेष पाहुण्यांनी ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या दिशेने विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाचा गौरव करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या निमंत्रणाचा उद्देश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR