पुणे : राज्य परिवहन विभागाने वाहनचालक परवाने काढण्यापूर्वीच्या प्रक्रियेत नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली. परंतु, या निर्णयामुळे परवाना काढणा-यांना चाचणीपूर्वीच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रचंड तक्रारी आणि समस्या निर्माण झाल्याने नागरिक आणि संघटना आक्रमक झाल्या. अखेर यावर तातडीने निर्णय घेऊन बदल करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन विभागाकडूनच देण्यात आले आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीनुसार पक्का वाहनचालक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेनुसार नोंदणी करण्यासाठी रात्री एक ते दुपारी चार वाजेपर्यंत वेळ निश्चित केली. तसेच, परवाना देण्यापूर्वीच्या चाचणींची संख्या २५४ पर्यंत घटविण्यात आली. पूर्वी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये दररोज ५०० ते ८०० पर्यंत वाहनधारकांची चाचणी घेऊन पक्के परवाने देण्यात येत होते.
त्याचबरोबर अर्जदारांना ऑनलाईन ‘स्लॉट’ नोंदणीसाठी सुलभ सुविधा आणि कालावधी होता. मात्र, नवीन मार्गदर्शक तत्त्वांमधील वेळ आणि कालमर्यादेमुळे अर्जदारांना रात्री उशिरानंतर प्रक्रिया करण्यास बसावे लागत आहे. अनेकदा दुपारी नोंदणी प्रक्रिया सुरू केल्यास मर्यादा संपुष्टात येत असल्याने आणि ऑनलाईन सर्व्हरवर पडणारा ताण यामुळे प्रतीक्षेत रहावे लागत आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना आणि वाहन चालक प्रशिक्षण केंद्रांना बसत असून अनेकांनी या नवीन मार्गदर्शक तत्त्वाबाबत नाराजी व्यक्त केली.
या ठरावीक मर्यादा निश्चित करून दिल्याने पक्के परवाने काढण्यासाठी मोटारचालक प्रशिक्षण केंद्रांना आणि वाहन मालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, ऑनलाइन स्लॉटची नोंदणी सुरू होताच काही मिनिटांत मर्यादा संपत आहे. अनेक अर्जदारांना जानेवारी अखेरपर्यंत स्लॉट मिळण्याची शक्यता नसून, किमान एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार संघटनांकडून करण्यात आल्या. अखेर आरटीओ कार्यालयाकडून नियमांमध्ये शिथिलता आणून प्रति दिवस चाचणीची संख्या आणि स्लॉटच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ अधिका-यांकडून देण्यात आली.
५०० स्लॉट उपलब्ध करणार
परिवहन विभागाच्या आदेशानुसार पक्क्या वाहनचालक परवान्यांच्या चाचणीसाठी स्लॉटची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असल्याने पुण्यात अर्जधारकांना अडचणी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्याने ५०० स्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी पहाटे ६ ते सायंकाळी ४ या वेळेत स्लॉट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुण्याचे स्वप्नील भोसले यांनी दिली आहे.

