नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशात लोकशाही संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करत आहेत. मतदार यादीतील ‘फॉर्म ६’ मधील नियमबा बदलांना सुप्रीम कोर्टाने मान्यताच दिली नव्हती, हे उघड झाल्यानंतर आता कोर्टानेही निवडणूक आयोगाला फटकारले असल्याची टीका नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँगे्रसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नवी दिल्लीतील इंडिया आघाडीचा मोर्चा, मतदार यादीतील ‘एसआयआर’ घोटाळा, राज्यातील भीषण दुष्काळ व जलसंधारणातील ३८ हजार कोटींचा भ्रष्टाचार, एमपीएससी अध्यक्षांची चौकशी, मुंबई महापालिकेतील कंत्राटशाही आणि गोंदियातील रेशन तांदूळ घोटाळ्यावर सरकारला उघडे पाडले.
ज्ञानेश कुमार मोदी-शाहांचा मोहरा
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि दिल्लीतील इंडिया आघाडीच्या खासदारांच्या मोर्चावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एसआयआरच्या नावाखाली देशभरात उघडपणे मतचोरीचे काम सुरू होते. मोदी सरकारने ज्ञानेश कुमारांना केवळ एक मोहरा म्हणून वापरून संपूर्ण देश भडकावला आहे. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही याच प्रक्रियेचा गैरवापर करण्यात आला. लोकशाहीत मतदान प्रक्रिया निष्पक्ष असलीच पाहिजे; अन्यथा लोकशाही टिकू शकत नाही.
भाजप कार्यालयातून मतदार याद्यांचा खेळ
सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन बेकायदेशीररीत्या फॉर्म ६ आणला गेला. भाजपच्या कार्यालयांमधून फॉर्म भरून घेऊन विरोधकांची मते वगळायची आणि स्वत:ची जोडायची, असा धंदा सुरू होता. आता सुप्रीम कोर्टानेच स्पष्ट केले की या बदलांना आमची परवानगी नव्हती. न्यायालयाने खोटेपणा पकडल्यानंतरही ज्ञानेश कुमार खुर्चीला चिकटून बसले आहेत, हा संविधानाला लागलेला मोठा कलंक आहे.
३८ हजार कोटी खर्चूनही धरणांवर पोलीस पहारा?
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळाची तुलना कोरोनापेक्षा भयंकर परिस्थितीशी केल्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. सरकारने जलसंधारणावर आतापर्यंत ३८ हजार कोटी रुपये खर्च केले आणि महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त केल्याच्या बाता मारल्या. मग एका वर्षात पावसाने ओढ देताच धरणांनी तळ कसा गाठला? हे कोट्यवधी रुपये कोणी मुरवले आणि कोणी जिरवले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
















