सातारा : कडाक्याच्या उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे बळिराजा संकटात आला आहे. साता-यात शनिवारी रात्री आणि सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारांच्या पावसाने काढणीला आलेले ज्वारी आणि गव्हाचे पीक पाण्यात गेले अन् शेतकरी राजा कोलमडला. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
सातारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला आहे. जावळी तालुक्यात गारांचा पाऊस झाला. रानगेघर, करंदी आणि मेढा परिसरात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतात काढणीसाठी तयार असलेल्या गहू आणि ज्वारीच्या पिकाला या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

