नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचे प्रत्यार्पण करावे अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे असे वृत्त पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने दिले आहे.
हाफिज सईदचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे आवाहन भारत सरकारने पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाला केले आहे. मात्र, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. हाफिज सईद हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे. हाफिज सईद २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ला आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत हाफिज सईद पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत होता आणि त्याच्या संघटनेसाठी देणग्या गोळा करत होता, परंतु आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर २०१९ मध्ये हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. दहशतवादाला आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपाखाली त्याला १५ वर्षांचा तुरुंवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. मागील वर्षी पाकिस्तानी न्यायालयाने हाफिज सईदला दहशतवादी घटनांसाठी पैसा गोळा केल्याच्या आरोपावरून ३१ वर्षांची शिक्षा सुनावली होती.
सईद निवडणुका लढतोय
अमेरिकेनेही हाफिज सईदला दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याच्या वृत्तानुसार त्याचा पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करत आहे. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही लाहोरमधून पक्षाचा उमेदवार आहे. पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग ही जमात उद दावा या प्रतिबंधित संघटनेची राजकीय शाखा आहे.