कोल्हापूर : राज्यातील महायुतीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ यांना इतक्या उचांकी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असे आवाहन त्यांनी कागलच्या जनतेला केले आहे.
अजित पवार हे रविवारी कोल्हापूर दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाने जाहीर केलेली ही पहिलीच उमेदवारी आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफांनी अजित पवारांची साथ दिली.
महायुतीत आल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा विश्वास हसन मुश्रीफांना होता. त्यामुळे ‘यंदाही सिक्स मारणार फिक्स’ असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांना सहाव्यांदा आमदार करण्याचा निश्चय केला आहे.
हसन मुश्रीफांची ही सातवी विधानसभा निवडणूक असणार आहे. या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले आहेत. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणा-या संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता.
हसन मुश्रीफ हे पवार कुटुंबीयांच्या अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जायचे. शरद पवारांचीही त्यांच्यावर विशेष मर्जी होती. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुश्रीफांनी अजित पवारांची साथ दिली. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे असलेला ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती.