मुंबई : प्रतिनिधी
मागच्या ३ दिवसांपासून क्षणाचीही उसंत न घेता कोसळणा-या पावसाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकणसह राज्यातील काही जिल्ह्यांत हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून महामार्ग ठप्प झाले. दरड कोसळल्याने पुणे-मुंबई महामार्गासह रेल्वेसेवा ठप्प झाली. नुकत्याच सुरू झालेल्या मिसिंग लिंकचेही मोठे नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावर २ ठिकाणी दरड कोसळली असून हजारो वाहने रस्त्यात अडकली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती स्थितीचा आढावा घेतला. ८ तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून, अनेक जिल्ह्यात पुढील ४८ तासात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला. अतिवृष्टीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.
जून महिन्यात पाऊस बेपत्ता होता. परंतु ३ जुलैला राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने अर्ध्या महाराष्ट्रात प्रलयाची स्थिती निर्माण केली. शनिवारपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला. सतत कोसळणा-या पावसाने या भागात, विशेषत: रायगड जिल्ह्यात हाहाकार उडाला. दरडी कोसळल्याने मुंबई-पुण्याला जोडणारे दोन्ही महामार्ग व रेल्वेसेवा ठप्प झाली. मिसिंग लिंक वरील पहिल्या बोगद्याजवळ दरड कोसळली. त्यामुळे हा मार्ग ठप्प झाला. कडा कोसळल्याने कशेडी जवळ बोगद्याचा स्लॅब कोसळला. खालापूर टोलनाक्याजवळ डोंगरावरून पाणी व माती आल्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. तेथील फूड मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. मंकी हिल जवळ दरड कोसळली. त्यातच रुळाखालील भराव वाहून गेल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली. मुंबई-पुण्यादरम्यानच्या ६ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला असून, अभूतपूर्व संकटामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग २४ तास कार्यरत असून अगदी गावपातळीपर्यंत लक्ष देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. वसई-विरार, पालघर या ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. गुजरातमधून येणा-या ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना रस्ते मार्गाने जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायगडमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पण शहरांत पाणी शिरलेले नाही. चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा घाटाच्या भागात अतिवृष्टी झाली. कोल्हापूरमध्येही पाण्याची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे चालली आहे. तिथे पुराचा धोका निर्माण होऊ नये, याचा प्रयत्न सुरू आहे. पालघर जिल्ह्यात छोटे धरण आहे, त्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून खालच्या गावांना रिकामे करण्याचे काम सुरू आहे. ८ तारखेपर्यंत ही परिस्थिती असेल त्याकडे लक्ष ठेवावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईत ३ दिवसांत
३०० मि. मी. पाऊस
मुंबईत ३ दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत असून शहर विभागात ३०० मिलीमीटर, पूर्व उपनगरात ३८० मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांत ३४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या विक्रमी पर्जन्यामुळे आणि ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणा-या वादळी वा-यामुळे आपत्कालीन स्थिती ओढवली आहे. या परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
४ दिवसांत महिन्याच्या
सरासरीएवढा पाऊस
मुंबईत गेल्या चार दिवसांत महिन्याभराच्या सरासरीएवढा पाऊस पडला. पालघर, वसई-विरार, रायगड, सातारा, कोल्हापूर आदी परिसरातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मुंबईसह पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूकदेखील ठप्प झाली आहे.
२ दिवसांत १४ बळी
अतिवृष्टी व त्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये राज्यात दोन दिवसात १४ जणांचा बळी गेला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत राज्यात १४ जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्ये भिंत पडून ६ जणांचा मृत्यू झाला. पुण्यात एकाचा, ठाण्यात भिंत पडून एकाचा मृत्यू झाला तर मुंबई उपनगरात झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
राज्याच्या अनेक जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्तीस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून आढावा घेतला. राज्याच्या विविध भागात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला. कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागाला ढगफुटीचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर
१०० टनांचा राडारोडा !
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दरड कोसळल्याने १०० टन राडारोडा झाला आहे. त्यातील ७० टन मलबा काढून टाकण्यात आला. मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वत: तिथे जाऊन लक्ष ठेवून आहेत. ही अभूतपूर्व स्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे मलबा कधीच आला नव्हता. मलब्यात अडकलेल्या चारचाकी वाहनांना काढण्याचे कार्य सुरू आहे. रेल्वेनेही वेगाने कारवाई सुरू करून सेवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
आळंदीत पूरस्थिती,
वारकरी अडकले
आता वारी सुरू होते आहे. इंद्रायणीवरचे चारही पूल पाण्याखाली चालले आहेत. १० तारखेला पुण्यात वारी येते. पण या स्थितीमुळे वारक-यांनी देहू-आळंदीला जमा न होता पुण्यात यावे. वारीकरिता ज्या व्यवस्था करायच्या आहेत, त्या केल्या आहेत. जर्मन हँगरच्या माध्यमातून वारक-यांची व्यवस्था केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हे नैसर्गिक संकट
नुकत्याच सुरू झालेल्या मिसिंग लिंक येथे दरड कोसळल्याने विरोधकांनी सरकारवर आरोप व टीकेची झोड उठवली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांनी आजवर एक पूलही कधी बांधला नाही. ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यांमध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही. दरड कोसळल्याने ही घटना झाली आहे. ही नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे अशा आरोपांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्य विधिमंडळाचे
कामकाज तहकूब
अतिवृष्टीमुळे रस्ते, रेल्वे व हवाई वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तिस-या आठवड्याच्या कामकाजासाठी अनेक आमदार आज मुंबईत पोचू शकले नाही. विधानभावातील अनेक कर्मचारी व अधिकारीही रस्त्यात अडकले. त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार अमिन पटेल यांनी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि ज्या लोकांचे बळी गेले, त्यांची जबाबदारी कोणाची, याचा जाब विचारत सरकारने यासंदर्भात सभागृहात निवेदन करण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व असून निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत, असे म्हटले.
मानखुर्दमधील ’ती’
इमारत बेकायदेशीर
मानखुर्द येथे रविवारी रात्री तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, ही इमारत बेकायदेशीर होती. त्या इमारतीतील नव्हे तर तिच्या ढिगा-याखाली आलेल्या झोपड्यांतील नागरिकांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाव्य धोका लक्षात घेऊन गेल्या २ दिवसांत धोकादायक भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई-पुणे मिसिंग
लिंक मार्गावर दरड
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गावर दरड कोसळल्यानंतर विस्कळीत झालेल्या वाहतुकीची माहिती देताना फडणवीस म्हणाले, या महामार्गावरील तातडीने वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. दोन्ही बाजूंनी वाहनचालकांना सतर्क करण्यात आले. काही वाहने अडकली असली तरी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
















